‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे आज पवार यांच्याहस्ते उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे
आज पवार यांच्याहस्ते उद्‍घाटन
‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे आज पवार यांच्याहस्ते उद्‍घाटन

‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे आज पवार यांच्याहस्ते उद्‍घाटन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून (ता. ६) पिंपरीत सुरू होत आहे. संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता संमेलनाचे उद्‍घाटन होईल.
चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, कृषी, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या देशातील व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड येथील सहभागी होतील. उद्‍घाटनप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे असतील. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई यांचा ‘जागतिक मराठी गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे संमेलनाध्यक्ष असून विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष आहेत. अमेरिकेत खासदार झालेली पहिली मराठी व्यक्ती श्रीनिवास ठाणेदार यांना संमेलनानंतर जानेवारीच्या अखेरीस ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कारा’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. ‘समुद्रापलीकडे’, ‘कलावंतांच्या सामाजिक जाणिवा’, ‘जागतिक आरोग्यव्यवस्था आणि भारत’, ‘बीज अंकुरले’, ‘चित्र-शिल्प-काव्य’, ‘सरस्वतीच्या मंदिरात’, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ असे कार्यक्रम होतील. ‘व्यंग, वास्तव आणि राजकारण’ विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा व्यंगचित्रकार राज ठाकरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, सुबोध भावे, प्रवीण तरडे, आकाश ठोसर यांचे विचार ऐकायला मिळतील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी समारोप होईल.