अंध दांपत्य भीतीच्या सावटाखाली पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवले उंबरठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध दांपत्य भीतीच्या सावटाखाली  
पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवले उंबरठे
अंध दांपत्य भीतीच्या सावटाखाली पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवले उंबरठे

अंध दांपत्य भीतीच्या सावटाखाली पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवले उंबरठे

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : रस्त्याने जाताना, सिग्नलवर भीक मागताना कधी अंगावर दगड येतील, लाथाबुक्क्यांनी मारहाण होईल अथवा गाडी अंगावर येईल, हे सांगता येत नाही. अशाप्रकारचा आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीने पिंपरीतील मोरवाडी येथील अंध दांपत्य सध्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. घराबाहेर पडताना त्यांच्या उरात अक्षरशः धडकी भरते. यासह त्यांच्या आठ वर्षीय मुलीला पळवून नेण्याची भीतीही त्यांना सतावतेय. अशा अडचणीत सापडलेल्या दाम्पत्याने न्याय मागणीसाठी पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचेही उंबरे झिजवले. मात्र, कुठेही दाखल घेतली जात नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

धर्मेंद्र शामराव लोखंडे, त्यांची पत्नी शीतल व आठ वर्षीय मुलगी लालटोपीनगर येथे राहतात. धर्मेंद्र व शीतल दोघेही अंध आहेत. सिग्नलवर पैसे मागून तसेच विविध हिंदी, मराठी गाणी सादर करून मिळालेल्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, काही लोक त्यांना सतत त्रास देत आहेत. शिवीगाळ, मारहाण करीत दगड मारतात. भीक मागून देत नाहीत. रस्त्याने जाताना अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. तातडीच्या मदतीसाठी ११२ क्रमांकावर फोन केल्यास काही वेळाने पोलिस येतात. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेलेले असतात. तेथे आलेले पोलिस केवळ दिखावा करून निघून जातात.
तसेच त्यांच्याकडील मुलगी चोरून आणल्याचा आरोप देखील केला जातो. मुलीला पळवून नेण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दरम्यान, लोखंडे यांच्याकडे मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र असतानाही त्यांच्यावर वारंवार वेगवेगळे आरोप केले जात आहेत.
याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यासह आयुक्तालयात तक्रार केली. जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार केली. मात्र, त्याची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे लोखंडे यांनी सांगितले. या प्रकारामुळे हे दांपत्य अक्षरशः वैतागले आहे.
---------------
आम्हाला त्रास देणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगून तक्रार करूनही कठोर कारवाई केली जात नाही. ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यास तक्रारही घेतली जात नाही. याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या त्रासामुळे जगणे अवघड झाले आहे. यामध्ये आमचे किंवा आमच्या मुलीच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास काय करायचे. अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
- धर्मेंद्र लोखंडे, पीडित.
------------------

मुलीला शाळेतही पाठवता येईना

मुलीच्या पळवून नेण्याची, जिवे मारण्याची धमकी दिली जाते. मुलीच्या जिवाच्या भीतीने लोखंडे तिला शाळेतही पाठवत नाही. त्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
---------------

फोटो ः 16714