
स्वच्छ शहराला फ्लेक्सचे ग्रहण महापालिकेची धडपड ः देशात अव्वल क्रमांकासाठी प्रयत्न
पिंपरी, ता. १६ ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय समिती पुढील महिन्यात शहरात परीक्षणासाठी येणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रमुख रस्त्यांवरील चौक, पदपथ, दुभाजक, झाडांची खोडं, संरक्षक भिंती, भुयारी मार्ग आदी ठिकाणी रंगरंगोटी व सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, वेगवेगळ्या शुभेच्छा व जाहिरात फलकांमुळे (फ्लेक्स) शहराचे विद्रूपीकरण होत आहे. असे फलक व भित्तिपत्रके म्हणजे स्वच्छ शहरासाठी ग्रहणच लागले आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेवर महापालिकेने भर दिला आहे. गेल्या पाच वर्षात शहर राष्ट्रीय स्तरावर कधी ५१ तर कधी १९ व्या स्थानावर राहिले आहे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना महापालिका करीत आहे. त्याअंतर्गत स्वच्छतेत देशात सलग पाच वर्षे अव्वल स्थानी असलेल्या इंदूर शहराचा अभ्यास दौराही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी केला होता. त्यानंतर कचरा संकलनासाठी इंदूर पॅटर्न राबविला जात आहे. बहुतांश नागरिकही कचऱ्याबाबत संवेदनशील झाले आहेत. मात्र, फ्लेक्समुक्त शहर केव्हा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेची तयारी
प्रमुख चौक, पदपथ, दुभाजक, झाडांची खोडं, संरक्षक भिंती, भुयारी मार्ग आदी ठिकाणी रंगरंगोटी सुरू आहे. सुशोभीकरणावर भर आहे. रस्ते, पदपथ, उद्याने, मैदाने, क्रीडांगणे, छोट्या गल्ल्या, महामार्ग यांची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती केली जात आहे. प्रमुख १३ चौकात भंगारातून विविध शिल्प साकारली आहेत. ‘टाकाऊतून टिकाऊ’ संकल्पनेवर आधारित भंगार साहित्यातून वस्तू बनवून उद्यान साकारले आहे. कचरा कुंड्या हटवल्या असून घरोघरी ओला, सुका, घातक, प्लास्टिक असे कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन सुरू आहे. जैववैद्यकीय कचऱ्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे.
असे होतंय विद्रूपीकरण
काही नागरिकांनी प्रसिद्धीसाठी वाढदिवस शुभेच्छा, लग्न सोहळ्याचे आमंत्रण, नवीन वर्ष व संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे फलक (फ्लेक्स) ठिकठिकाणी लावले आहेत. डिसेंबरमधील वाढदिवसांच्या व नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दर्शक फलक अद्यापही कायम आहे. तसेच, दुभाजकांवरील विद्युत खांबांवर जाहिरातींसाठी तीन बाय दोन फूट लांबी-रुंदी आकाराचे अनधिकृत फलक लावले आहेत. पुलांचे खांब, झाडांची खोडं, भिंती आदी ठिकाणी जाहिरातींची भित्तिपत्रके चिकटवून विद्रूपीकरण केले आहे. पुणे-नाशिक महामार्ग असो की देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता व नद्यांचा किनारा, काही ठिकाणी बांधकामाचा राडारोडा टाकला जात आहे.
पिंपळे सौदागर, वाकड, भोसरी, मोशी, डुडुळगाव परिसरात जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी सांगाडे उभारले आहेत. अधिकृत बरोबरच अनधिकृत फलकही अधिक आहेत. ते दिसण्यासाठी रस्त्याच्या कडेचे व पदपथांवरील झाडांची कत्तल करून विद्रूपीकरण सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- तनय पटेकर, स्वयंसेवक, आंघोळीची गोळी संस्था
स्वच्छ अभियानांतर्गत केंद्रीय परीक्षण समिती फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात कधीही शहरात येऊ शकते. रस्त्यांचे सुशोभीकरण व स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती सुरू आहे. शहरातील नागरिकांचा सहभाग वाढीसाठी शाळा, महाविद्यालय, सोसायट्या, हॉटेल्स अशी वर्गवारी करून दरमहा स्वच्छता स्पर्धा घेतली जात आहे.
- विनोद जळक, सहायक आयुक्त तथा मुख्य समन्वयक, स्वच्छ भारत अभियान, महापालिका
---
फोटो ः 18789, 18790