पिंपरीत तब्बल २४१ जणांकडे २५ लाखांवर मिळकतकर थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pcmc
तब्बल २४१ जणांकडे २५ लाखांवर थकबाकी बड्या थकबाकीदारांकडून कर वसुलीचे महापालिकेपुढे आव्हान

Pimpri Chinchwad : पिंपरीत तब्बल २४१ जणांकडे २५ लाखांवर मिळकतकर थकबाकी

पिंपरी - मिळकतकर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर महापालिकेतर्फे जप्ती व वसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे. २५ ते ५० लाख थकबाकी असलेल्यांची संख्या २४१ आहे. यामध्ये नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारती, काही कंपन्या, शैक्षणिक संस्था व खासगी व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून थकबाकी वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

मिळकतकराकडे महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिले जात आहे. मात्र, वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्यांमुळे थकबाकीची रक्कम वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थात ३१ मार्चपर्यंत एक हजार कोटी रुपयांचा मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. त्यासाठी थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम राबवली जात आहे. यात निवासी व व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश आहे. जप्त केलेल्या काही मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल ४८० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल करण्यासाठी महापालिकेने थकबाकी असलेल्या सदनिकाधारकांना कर भरण्यास सांगा, अशा आशयाचे पत्र १०० सोसायट्यांच्या अध्यक्षांना पाठविले आहे.

शहरातील स्थिती

- शहरातील एकूण मिळकती - ५ लाख ९२ हजार

- करसंकलन कार्यालये - १७

- गेल्या वर्षी कर संकलन - ६२५ कोटी

- यंदाचे कर संकलन उद्दिष्ट - १००० कोटी

- यंदा आतापर्यंत वसुली - ५७५ कोटी

- तीन लाख निवासी मालमत्ताधारकांकडे थकबाकी - ५८३ कोटी

असे आहेत थकबाकीदार

- ५० हजारांपुढील थकबाकीदार - २६,७६०

- पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले व्यावसायिक - १,३६१

- मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेले - ३,८५०

- एकूण थकबाकीदार - ३१,९७१

- २५ ते ५० लाखांपर्यंतचे थकबाकीदार - २४१

- जप्तीच्या नोटीस दिलेले थकबाकीदार - ३१ हजार ९७१

थकबाकी वसुलीसाठी उपाययोजना

- थकबाकी असलेल्या १०० सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना पत्र

- सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगूनही थकबाकी न भरल्यास जप्ती

- मार्च २०२३ अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू

- मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व सुविधा ऑनलाइन

थकबाकीची कारणे

- वेगवेगळे टॉवर, जागांबाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट

- काही मोकळ्या जागा

- काही मोकळ्या जागांवर लावलेले कर बांधकामांनंतरही तशाच नोंदी

- काही संस्था आहेत, कंपन्या, शैक्षणिक संकुले आहेत

- काही कंपन्या अवसायानात निघाल्या आहेत

शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील सदनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये एक ते दीड हजार सदनिका धारकांकडे थकबाकी आहे. त्यांनी कर भरावा म्हणून सोसायटी अध्यक्ष, सचिवांनी त्यांना सांगावे. थकबाकीदारांची नावे सोसायटी नोटीस बोर्डावर लावावीत. त्यानंतरही थकबाकीदार सदनिकाधारकांनी कर न भरल्यास सोसायटी अंतर्गत त्यांचे नळजोड तोडण्यासाठी अध्यक्ष, सचिवांना विचारात घेऊन कारवाई करण्यात येईल. मालमत्ता धारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करून शहर विकासात योगदान द्यावे.

- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन, महापालिका