
मुलाकडून आईला चिखलीत मारहाण
पिंपरी, ता. १९ : जमीन विकून पैसे देण्याच्या कारणावरून मुलाने आईला बेदम मारहाण केली. हा प्रकार चिखली येथे घडला.
सोमनाथ उर्फ शंकर दत्ता सुरवसे (रा. भीमशक्तीनगर, साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची ५७ वर्षीय बहिण भीमशक्तीनगर येथे एकट्याच राहत असून, त्यांच्या शेजारीच त्यांचा आरोपी मुलगा पत्नीसह राहतो. त्याच्या वडिलांनी गावाकडील जमीन विकून त्याचे पैसे सर्वाना वाटप करून दिले. आरोपीच्या पत्नीने त्यांच्या वाटणीला आलेल्या पैशातून अर्धा गुंठा जमीन विकत घेतली. आरोपीला ती जमीन विकून पैसे हवे असल्याने तो त्याची पत्नी व आईसोबत काही महिन्यांपासून वाद घालत आहे. पत्नी जागा विकून पैसे देत नसल्याने आरोपीने वाद घातला. पत्नीला सांगून जागा विकून पैसे दे असे म्हणत आईला मारहाण केली. धक्काबुक्की केल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब आरोपीने सर्वांपासून लपवली. कोणाला काहीही न कळवता आई बाथरूममध्ये घसरून पडल्याचे डॉक्टरांना खोटे सांगून ॲडमिट केले. तसेच आईच्या घरातील काचा, टीव्ही, मोबाईल फोडून नुकसान केले.