
बाथरूममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांना मिळाली आई
सोमाटणे, ता. २० ः वन्यजीव रक्षक संस्थेच्या तत्परतेमुळे सोमाटणे येथील एका कंपनीच्या बाथरूममध्ये अडकलेल्या पिलांना मिळाली आई.
आईपासून दुरावलेली उदमांजराची दोन पिल्ले आज सोमाटणे येथील एका कंपनीच्या बाथरूममध्ये अडकली होती. अशी माहिती पवन दंडेल यांनी तातडीने वन्यजीव रक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली. वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य संतोष गोपाळे, जीगर सोलंकी, झाकिर शेख हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी बाथरूममध्ये अडकलेल्या दोन्ही उदमांजराच्या पिल्लांना सुरक्षित पकडले व घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव व वन्यजीव रक्षक संस्थेचे नीलेश गराडे घटनास्थळी गेले. असता तेथून जवळच आई आपल्या पिल्लांना शोधत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने दोन्ही पिल्लांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली व पिल्लांना आईजवळ सोडले. त्यानंतर दोन्ही पिल्ले आपल्या आईबरोबर जंगलात निघून गेली.