
चिंचवड येथून रविवारी श्री मंगलमूर्तींची माघी रथयात्रा
पिंपरी, ता. १९ ः चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची माघी रथयात्रा रविवारपासून (ता.२२) सुरु होणार आहे. दुपारी बाराला पालखी प्रस्थाना निमित्त मिरवणूक असेल. यात्रेचा समारोप १ फेब्रुवारीला होईल.
रविवारी दुपारी निघणारी पालखी मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड, जुना मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा मार्गे जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात मुक्कामी असेल. सोमवारी पहाटे साडेचारला भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल. मंगळवारी सकाळी सहाला मंदिरातून शिवरी, रासकर मळा, श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळा मार्गे रात्री नऊला मोरगाव येथे पोहचेल.
पालखी प्रवास
ता. २५ व २६ ः मुक्काम मोरगाव येथेच
ता. २७ ः मुक्काम जेजुरी
ता. २८ ः मुक्काम सासवड येथील कऱ्हाबाई मंदिर
ता. २९ ः सासवड येथून दिवे घाट, हडपसर, सोलापूर रोड मार्गे मुक्काम थेऊर
ता. ३० ः पाटस, दौंड, शिरापूर मार्गे मुक्काम सिद्धटेक
ता. ३१ ः परतीचा प्रवास. दौंड, पाटस, सोलापूर रोड, हडपसर, पुलगेट मार्गे पुण्यातील एकनाथ मंगल कार्यालयात मुक्काम
ता. १ फेब्रुवारी ः चिंचवड येथील मंदिर.
--
५२५ वर्षांची परंपरा
मोरया गोसावी दरमहा श्री मयुरेश्वर दर्शनास जात असत. त्यांना वयाच्या ११७ व्या वर्षी १४८९ साली मयुरेश्वरची तांदळा मूर्ती मोरगाव येथील गणेश कुंडात प्राप्त झाली. वार्धक्यामुळे ते दरमहा ऐवजी केवळ माघ व भाद्रपद महिन्यात मोरगाव येथे जावू लागले. मंगलमूर्तींची प्रसाद मूर्ती माघ महिन्यात रथातून पालखी मोरगाव येथे घेऊन जाण्याची ही परंपरा आहे. गेली सुमारे ५२५ वर्ष पेक्षा अधिक काळ अविरत सुरू आहे.
- मंदार महाराज देव, मुख्य विश्वस्त