‘चिंचवड’मध्ये वाढले ४९ हजार ५५२ मतदार विधानसभा पोटनिवडणूक ः ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार ठरविणार आमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चिंचवड’मध्ये वाढले
४९ हजार ५५२ मतदार
विधानसभा पोटनिवडणूक ः ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार ठरविणार आमदार
‘चिंचवड’मध्ये वाढले ४९ हजार ५५२ मतदार विधानसभा पोटनिवडणूक ः ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार ठरविणार आमदार

‘चिंचवड’मध्ये वाढले ४९ हजार ५५२ मतदार विधानसभा पोटनिवडणूक ः ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार ठरविणार आमदार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ती बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणूक झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४९ हजार ५५२ मतदार संख्या वाढली आहे. ही वाढीव मतदारसंख्याच निर्णायक ठरू शकते.
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार असलेला चिंचवड मतदारसंघ आहे. मतदार ओळख पत्राला आधार कार्ड लिंक, नाव, वय यात दुरुस्ती. स्थलांतरीत व मृतांची नावे कमी केलीत. नव्याने राहायला आलेले व १८ वर्षे पूर्ण झालेल्यांची नोंदणी अशा दुरुस्त्या करून, जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसारच पोटनिवडणूक होणार असली तरी, किती उमेदवार असतील, कोण आमने-सामने असतील की निवडणूक बिनविरोध होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.

२०१९ ची स्थिती
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत झाली. कलाटे यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता. ते शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणजेच शिवसेनेचीही त्यांना साथ होती. तरीही जगताप यांनी ३८ हजार ४९८ मतांनी बाजी मारून विजयाची हॅट्ट्रिक साधली होती. जगताप व कलाटे यांच्यासह ११ उमेदवार रिंगणात होते.

तृतीय क्रमांकावर ‘नोटा’
२०१९ च्या निवडणुकीत खरी लढत जगताप व कलाटे यांच्यात झाली होती. कारण, तृतीय क्रमांकाची पाच हजार ८७४ मते ‘नोटा’ची होती. त्यांची टक्केवारी २.११ होती. अन्य उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र लोंढे उमेदवार होते. त्यांना तीन हजार ९५४ मते मिळाली होती. त्यांची मतांची टक्केवारी १.४२ होती. अन्य आठ उमेदवारांना एक हजार मतेही मिळवू शकले नव्हते. त्यांची मतांची टक्केवारी प्रत्येकी अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी होती.

मतदारसंख्या
वर्षे / मतदार
२०१९ / ५,१६,८३६
२०२३ / ५,६६,४१५

असे आहेत मतदार
पुरुष ः ३,०१,६४८
महिला ः २,६४,७३२
तृतीयपंथी ः ३५

निवडणूक कार्यक्रम
मतदान ः २७ फेब्रुवारी
मतमोजणी ः २ मार्च

चिंचवड मतदारसंघाची २०१९ ची स्थिती
उमेदवार / पक्ष / मिळालेली मते / टक्केवारी
लक्ष्मण जगताप / भाजप / १,५०,७२३ / ५४.१७
राहुल कलाटे / अपक्ष / १,१२,२२५ / ४०.३४
---