संपत्तीसाठी नातेसंबंधांमध्ये येतेय वैर जमीन विकताना विरोध केल्यास मारहाण, जीव घेण्यापर्यंत मजल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपत्तीसाठी नातेसंबंधांमध्ये येतेय वैर  
जमीन विकताना विरोध केल्यास मारहाण, जीव घेण्यापर्यंत मजल
संपत्तीसाठी नातेसंबंधांमध्ये येतेय वैर जमीन विकताना विरोध केल्यास मारहाण, जीव घेण्यापर्यंत मजल

संपत्तीसाठी नातेसंबंधांमध्ये येतेय वैर जमीन विकताना विरोध केल्यास मारहाण, जीव घेण्यापर्यंत मजल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : जमिनीला चांगले भाव येत आहेत. जमीन विकल्यास बक्कळ पैसा मिळतो. सहज पैसा मिळत असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांचा विरोध असला तरीही काहींकडून मात्र जमीन विकण्याचा हट्ट धरला जातो. विकताना विरोध झाल्यास वेळप्रसंगी वाद घालून पुढचे पाऊल टाकले जात आहे. यामध्ये रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यासह जीव घेण्यापर्यंतही मजल जात आहे. हे चिखली येथे घडललेया घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

पिढ्यानपिढ्या जपलेली अथवा कष्ट करून, पै पै जमा करून घेतलेल्या जमिनीवर शेती करण्यासह इतर उद्योग, व्यवसाय करण्याचे नियोजन असते. यासह आपली हक्काची जमीन असल्याने भावनाही गुंतलेल्या असतात. मात्र, सध्या जमिनींना चांगला भाव आल्याने ती विकण्याला काही जण प्राधान्य देतात. मात्र, यास कुटुंबातील कोणी विरोध केल्यास वाद होतात. यामध्ये समोर आपले वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, चुलता, पुतणे असे रक्ताच्या नात्यातील व्यक्ती आहेत, याचाही विचार केला जात नाही. जन्मदात्यांसह ज्येष्ठांनाही शिवीगाळ, धमकी यासह मारहाण करण्यापर्यंत मजल जात आहे.
चिखली येथे जमीन विकून पैसे देण्याच्या कारणावरून मुलाने ५७ वर्षीय आईला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. जमीन विकून पैसे हवे असल्याने तो त्याची पत्नी व आईसोबत काही महिन्यांपासून वाद घालत आहे. पत्नीला सांगून जागा विकून पैसे दे, असे म्हणत आईला मारहाण केली. कोणाला काहीही न कळवता आई बाथरूममध्ये घसरून पडल्याचे डॉक्टरांना खोटे सांगितले. तसेच घरातील काचा, टीव्ही, मोबाईल फोडून नुकसान केले. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध भागात अशा घटना वारंवार घडत आहेत. जमिनीला भाव आल्याने ती विकण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, जमीन विकताना कुटुंबातील सदस्यांमध्येच वाद होत असल्याने नात्यांमध्ये दुरावा, द्वेष निर्माण होत आहे. रक्ताच्या नात्याचे असूनही वर्षानुवर्षे एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत, अशी स्थिती आहे. नाती कवडीमोल झाली आहेत.
-------------------------
मौजमजा अन पैसा
काम धंदा न करता फुकटचा पैसे हातात यायला हवा. व्यसनासह इतर मौजमजाही हवी. मात्र, त्यासाठी पैसा हवा असल्याने काही तरुण वडिलोपार्जित जमीन विकण्याचा मार्ग निवडतात. घरात गोंधळ घालून कुटुंबियांना दमदाटी करीत मारहाण केली जाते. जीवघेणा हल्ला करण्याचेही प्रकार घडले आहेत.
-------------------------------------