चिमणराव- गुंड्याभाऊ करणार पुण्यात हवाईजहाजातून प्रवास
चि. मोरूला चिमणराव ‘आमची वाहने’ हा धडा शिकवत होते.
‘‘अप्पा, प्रात्यक्षिकासह वाहने तुम्ही शिकवली पाहिजेत.’’ त्यावर त्याच्या पाठीत धपाटा घालत चिमणराव म्हणाले, ‘‘शहाणाच आहेस की. हवाईजहाजाविषयी माहिती देताना ‘हवाईजहाजही चालवून दाखवा’ असे म्हणशील. अरे पूर्वी जुनी मोटार चालवताना माझी काय फे फे उडाली होती, हे आठवलं तरी अंगावर घर्मबिंदू जमा होतात. तेवढ्यात बाहेर फटफटीचा आवाज आल्याने मोरूने कान टवकारले.
‘‘अप्पा, जोरजोरात धूर सोडणारी एक अवजड दुचाकी घेऊन, गुंड्याकाका आला आहे.’’ चि. मोरूने म्हटले. बाहेर एका अवाढव्य धूड असणाऱ्या दुचाकीवर गुंड्याभाऊ स्वार झाला होता.
‘‘अरे चिमण, भूत पाहिल्यासारखं काय बघतोस? अरे मराठीत याला बुलेट म्हणतात. मालती गुणेने फारच हट्ट धरल्याने...’’ असं म्हणत गुंड्याभाऊने जीभ चावली. सोटा जमिनीवर आपटत घाईघाईने विषय बदलला.
‘‘अरे सभ्य गृहस्था, पण तुला हे इंधनाधारित दुचाकीवाहनाचे धूड कोठे मिळाले? की कोठे पैजेचा विडा जिंकलास?’’ चिमणरावांनी विचारले.
‘‘अरे चिमण, एकावेळी किती प्रश्न विचारशील? अरे लष्करातील कॅप्टन मॅकफर्सनला मी कुस्ती शिकवायला नव्हतो का जात. त्याची कुवेतला का कोठे बदली झालीय. त्याने गुरूदक्षिणा म्हणून हे जुनं डबडं दिलंय. आधी तू या गाडीवर बस. तुला गावातून चक्कर मारून आणतो.’’ गुंड्याभाऊने म्हटले. हे ऐकूनच चिमणरावांच्या अंगावर घर्मबिंदू जमा झाले.
‘‘अप्पा, मलापण यायचंय.’’ मैनाने हट्ट धरला.
‘‘अरे गुंडू, पण तुला दुचाकी थांबवता येते ना. नाहीतर चिमणसारखं करशील. मला मोटारीतून देवदर्शनाला घेऊन गेला आणि त्याला मोटारच थांबवता येईना. मग काय त्यातील इंधन संपण्यासाठी देवळाभोवती फेऱ्या मारत बसला.’’ आईने हसत म्हटले. त्यावेळी सौ. काऊदेखील पदरात तोंड लपवत हसू लागली. चिमणराव मात्र गोरेमोरे झाले.
मग गुंड्याभाऊने बळेच चिमणरावला गाडीवर बसवले. मोरू काही ऐकेना. मग त्यालाही मध्ये घेतला. गुंड्याभाऊने स्वयंप्रेरक दाबले. गतिवर्धक फिरवले.
‘फटफट’ असा जोरात आवाज येऊ लागल्याने रस्त्यावरील पादचारी सैरावैरा पळू लागले.
‘‘गुंडू, या कर्कश आवाजामुळे तुझ्या गाडीला ‘इशारा वाद्याची’ गरज नाही.’’ चिमणरावांनी हसत म्हटले. गुंड्याभाऊंनी मग दुचाकी जोरात दामटली. मात्र, पुढे एका खाकीधारी पोलिसाने त्यांना थांबवले.
‘‘तुम्ही भर शिवाजी रस्त्यावरून ताशी चाळीस मैल वेगाने दुचाकी चालवताय.’’ पोलिसाने दटावले.
‘‘साहेब, ही माझी शुद्ध बेअब्रू आहे.’’ गुंड्याभाऊने म्हटले.
‘‘मग ताशी वीस मैल वेगाने गाडी चालवत होता काय?’’ पोलिसाने विचारले.
‘‘मी ताशी साठ मैल वेगाने गाडी चालवतोय आणि तुम्ही वीस मैल म्हणून माझा अपमान करताय.’’ गुंड्याभाऊने असं म्हटल्यावर पोलिसाने दंड ठोठावला.
एक सहस्त्र रूपये दिल्यानंतर गुंड्याभाऊला सोडले. थोडं पुढं गेल्यावर गुंड्याभाऊ भ्रमणध्वनीवर बोलू लागले. त्यामुळे दोन शुभ्रवस्त्रधारी सदरा व खाकी विजार घातलेल्या पोलिसांनी अडवले.
‘‘वाहन चालवण्याचा परवाना दाखवा.’’ पोलिसाने असं म्हटल्यावर गुंड्याभाऊ बुचकळ्यात पडले.
‘‘आमच्यावेळी असं काही नव्हतं.’’ असं दोघेही म्हणू लागले. त्यातच एका दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे व कर्कश आवाजालाही पोलिसांनी आक्षेप घेतला.
‘‘पाच सहस्त्र दंड भरावा लागेल.’’ पोलिसांनी दम भरला.
‘‘एवढा दंड भरण्यासाठी बॅंकेकडून कर्ज काढावे लागेल.’’ असे चिमणराव हळूच म्हणाले. मग बराचवेळ त्यांच्यात खलबते झाली व शेवटी दोन सहस्त्र रूपयांवर तडजोड झाली.
‘‘अरे गुंडू, तुला हे जुनं डबडं फारच महागात पडतंय. रोज तीन सहस्त्र रूपये पोलिसांना देण्यापेक्षा हवाईजहाजातील प्रवास स्वस्त पडेल. तिथे हवाईसुंदरींकडून चहा-पान होईल. शिवाय या पुण्याच्या खड्ड्यांतून सुटका तरी होईल.’’ चिमणरावने असं म्हटल्यावर गुंड्याभाऊंनी मान डोलावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.