सोने खरेदीला झळाळी

सोने खरेदीला झळाळी

पिंपरी, ता. २२ : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला चांगलीच मागणी होती. सकाळपासूनच शनिवारी (ता.२२) सराफी पेढ्या खरेदीमुळे हाउसफुल्ल झाल्या होत्या. त्यातच लग्नसराई असल्याने सोने-चांदी खरेदीला अधिक मागणी वाढल्याचे दिसले. सोने खरेदीवर व्यावसायिकांनी विविध ऑफर्सचा धमाका ठेवल्याने सराफी बाजारपेठेकडे ग्राहकांना आकर्षित झाल्याचे पहावयास मिळाले.
गेल्या काही महिन्यांत सोन्याला मागणी नव्हती. परंतु, लग्नसराईचे मुहूर्त एप्रिलपासून सुरू झाले. सप्टेंबरपर्यंत हे मुहूर्त असल्याने आधीच सोन्याची खरेदी वधू-वराकडील मंडळीनी केल्याचे दिसून आले. लग्नाच्या खरेदीसह सोने घालण्याची क्रेझ असलेले अन्य ग्राहकही सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत. सर्वोच्च सोने खरेदीचा दिवस दिवाळीनंतर अक्षय्य तृतीया असल्याने परंपरेनुसार घरात समृद्धी व भरभराट यावी या हेतूने कुटुंबीय सोने खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देत होते. सोन्यात गुंतवणूक करावी भविष्यात तोळाभर सोनेही खरेदी करणे अवघड होइल, या हिशोबानेही ट्रेंड अधिक वाढल्याचे दिसले. अनेकजण मुलामुलींच्या लग्नासाठी काही वर्षांचा अवधी असूनही आत्तापासूनच सोने खरेदी करून ठेवतानाचे दृश्य पहावयास मिळाले.
बरेचदा सोन्याचे भाव कमी-जास्त फरकाने बदलताना दिसत आहेत. मार्च महिन्यात ५८ ते ६० हजारांच्या दरम्यान बाजारभाव होता. फेब्रुवारीत सोने ५५ हजारांच्या आसपास होते. तेच सोने एप्रिल महिन्यात ६० हजारांच्या घरात पोचले. या बाजारभावामुळेही सोने खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्या सोन्याला मेकिंग चार्जेस नाहीत म्हणजे मजुरी कमी आहे, असे सोने खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. या सोन्याला मोड जास्त येऊन नुकसान होणार नाही, या हिशोबानेही महिला खरेदी करीत असल्याचे दिसले.
त्यातही महिलांमध्ये मिनी गंठण, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या खरेदीकडे तर, पुरुषांमध्ये सोन्याची साखळी, ब्रेसलेट, हातातील कडे, अंगठी खरेदीकडे कल आहे. वर्षानुवर्षे रोखून ठेवलेली खरेदी देखील अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करताना दिसून येत आहे. सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस किंवा घडनावळ तपासणे अत्यंत आवश्यक असल्यास फसवणूक टळू शकते. त्याकरिता व्यावसायिकांकडून सोने व चांदी खरेदीची शुद्धता तपासण्यासाठी बिल घेणे आवश्यक असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सोन्याचे अक्षय्यतृतीया दिवशीचे भाव - प्रती तोळ्याप्रमाणे
सोने : २२ कॅरेट : ५६२००
सोने : २४ कॅरेट : ६०१००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com