पाहुणे येती घरा.....

पाहुणे येती घरा.....

‘‘सोहम, बेल वाजतेय. दरवाजा उघड.’’ किचनमधून माधवीने आवाज दिला.
‘‘कोण आलंय?’’ माधवीने पुन्हा आवाज दिला.
‘‘अगं ते रिकामटेकडे काका आलेत. तू बाबांना नेहमी म्हणतेस ना, ‘बकासुरासारखे खाणारे तुमचे फुकटखाऊ मित्र आले, की
डोक्याची कटकट वाढते. ते काका आले आहेत.’’ सोहमने उत्तर दिले. त्यावर माधवी एकदम गडबडली व पळत जाऊन तिने सेफ्टी दरवाजा उघडला.
‘‘सोहम, गंमत करतोय.’’ कसनुसं हसत माधवीने म्हटले.
‘‘तुमची आठवण काढून, आताच ‘हे’ बाहेर गेलेत.’’ माधवीने म्हटले. त्यानंतर दिलीपराव सोफ्यावर बसले. रिमोट घेऊन, ते चॅनेल बदलू लागले.
‘‘तुम्ही चहा घेणार की कोल्ड्रिंक. का आईसक्रीम देऊ?’’ माधवीने म्हटले.
‘‘पाच- पाच मिनिटांच्या फरकानं सगळंच आणा. इथं कोणाला घाई आहे.’’ दिलीपरावांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सोहमकडे वळवला.
‘‘अभ्यास कसा चाललाय?’’ दिलीपरावांनी विचारले.
‘‘व्यवस्थित ‘चाललाय’ पण चालून चालून त्याचे पाय दुखायला लागलेत. त्यामुळे त्याला सायकल घ्यावी म्हणतोय.’’ सोहमने म्हटले.
‘‘काय रे पहिल्यापासून तू उद्धट आहेस की शाळेत तुला उद्धटपणा शिकवला.’’ दिलीपरावांनी म्हटले.
‘‘कोणाशी कसं वागावं, हे शाळेत शिकवतात.’’ सोहमने उत्तर दिले.
‘‘रमेश म्हणतो, माझा मुलगा अभ्यासात फार कच्चा आहे. मी त्याला म्हटलं, काळजी करू नकोस. मी त्याचा अभ्यास घेत जाईल.
पंचवीसचा पाढा म्हणून दाखव बरं.’’ दिलीपने म्हटलं.
‘‘आता पाठांतराला काही किंमत राहिली नाही.’’ सोहमने म्हटले.
‘‘अरे काय ही हल्लीची पिढी. पाठांतराला काही किंमत नाही म्हणे. मी तुझ्याएवढा होतो. त्यावेळी शंभरपर्यंतचे पाढे पाठ होते. कविता इतकंच काय पण आमचे धडेही पाठ होते. अभ्यासात मी प्रचंड हुशार होतो. त्याच्या जोरावर तर मी इथपर्यंत प्रगती केली. बॅंकेत शिपाई म्हणून काम करणं, येरा- गबाळ्याचं काम नाही. आमच्या साहेबांचंही माझ्याशिवाय अडतं.’’ दिलीपरावांने म्हटले.
‘‘आमच्या लहानपणी घरी पाहुणे यायचे. त्यावेळी ते आम्हाला कोडी घालायचे, अवघड प्रश्‍न विचारायचे पण आम्ही कधी डगमगलो नाही. सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायचो. मोठेपणी काय होणार, असा प्रश्‍न ते हमखास विचारायचे. त्यावेळी मी कलेक्टर नाहीतर मामलेदार होणार असं उत्तर द्यायचो. त्यावर खूष होऊन पाहुणे आम्हाला पाच- दहा पैसे द्यायचे पण काय ही तुमची पिढी. तुमच्या घरी पाहुणे आले, की तुमच्या कपाळावर आठ्या चढतात.’’ दिलीपरावांनी म्हटले.
‘‘तुला कोणकोणत्या देशांच्या राजधान्या पाठ आहेत?’’ दिलीपरावांनी म्हटले. त्यावेळी सोहम वैतागून गेला.
‘‘अभ्यास केल्याशिवाय असल्या प्रश्‍नांची उत्तरे देता येत नाहीत. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्याशिवाय काहीही साध्य करता येणार नाही. मी बघ बॅंकेत शिपाई कसा झालो. या पदापर्यंत येणं काही सोपं नव्हतं.’’ दिलीपरावांनी जुनी कॅसेट लावली.
‘‘बरं पुढं काय करायचं ठरवलं आहेस?’’ दिलीपरावांनी प्रश्‍नांचा रोख बदलला.
‘‘तुम्ही गेलात की मी आणि आई हापूस आंबे खाणार आहोत.’’ सोहमने उत्तर दिले. त्यावर दिलीपराव चपापले पण तरीही त्यांनी विचारलं. ‘‘अरे मी आताचं नाही. भविष्यातलं विचारतोय.’’
‘‘बॅंकेत शिपाई होण्याचं माझं स्वप्न आहे म्हणजे मग मी कलेक्टर होईल. तुमचं जसं उलटं झालं, तसं माझंही होईल.’’ सोहमने असं म्हटल्यावर दिलीपरावांनी दुचाकीची चावी शोधण्यासाठी खिसे चाचपले.
‘‘भावोजी राहू द्या. सोहम फार हुशार आहे म्हणून त्याला बक्षिस वगैरे काही देऊ नका. तुम्ही खाऊ वगैरे काही आणत नाही, अशी त्याची तक्रार असते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा.’’ माधवीने असं म्हटल्यावर दिलीपरावांनी पाचशे रुपयांची नोट काढून, त्याच्या हातावर ठेवली. आजचा चहा, कोल्ड्रिंक्स आणि आईसक्रीम पाचशे रुपयाला पडल्याने त्याचा चेहराही ‘पडला’ होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com