Pimpri Chinchwad City
Pimpri Chinchwad CitySakal

Pimpri Chinchwad Accident Cases : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाला एक प्राणांतिक अपघात, ही आहेत अपघाताची कारणे

पिंपरी, ता. २ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दरदिवशी सरासरी एक प्राणांतिक अपघात होत आहे. रस्ते अपघातातही दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक आहे. खराब रस्ता, सूचना फलकांचा अभाव, अमानांकित गतिरोधक, अतिवेग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, मोठ्या वाहनचालकांच्या चुका आदी कारणांमुळे हे रस्ते अपघात झाल्याचे समोर येते. मागील सव्वा वर्षात प्राणांतिक अपघाताच्या ४३२ घटनांची नोंद झाली आहे.

रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्यास जीव गमवावा लागतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक गेल्यास कुटुंबावर मोठे संकट कोसळते. कुटुंबाचा आधारच गेल्याने कुटुंब उघड्यावर पडते. मानवी चुकांसह प्रशासनाच्याही चुका असतात. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालविणे आवश्यक असून, यासह प्रशासनाकडूनही रस्त्यावर विविध मार्गांवर उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

हेल्मेट आवश्यक
अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. हेल्मेटमुळे अपघातात होणाऱ्या मृत्यूचे व दुखापतीने प्रमाण कमी करता येते. अपघातामुळे येणारा जोर बाह्य आवरणामुळे विभाजित होतो. डोके, जबडा व चेहरा यांचे रक्षण होते. हेल्मेटचे आतील आवरण पॉलियुरेथिन अथवा पॉलिस्टायरिनचे असते. यामुळे डोक्याला स्थिरावण्यासाठी जागा मिळते. यामुळे डोक्याचे रक्षण होते.

अपघाताची कारणे
खराब रस्ता, अमानांकित गतिरोधक, ओव्हर स्पीड, सूचना फलकांचा अभाव, मद्यपान करून वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेट परिधान न करणे, अनेक ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, लेनची शिस्त न पाळणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन.

‘‘रस्ते अपघातात दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक असून, डोक्याला गंभीर इजा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास सुरक्षित प्रवास होतो. वेगाची, लेनची मर्यादा पाळून शिस्तीत वाहने चालविणे जेणेकरून आपण सुरक्षित राहू तसेच आपल्यामुळे इतरांनीही धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.’’
- दीपक साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नियोजन विभाग, वाहतूक शाखा

‘‘मी हेल्मेट परिधान करीत वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवितो. मात्र, खराब रस्ता, चुकीचे गतिरोधक, पथदिवे नसल्याने रस्त्यावरील अंधार, सूचना फलकांचा अभाव, रस्त्यावर कुठेही उभ्या असलेल्या गाड्या यामुळे अनेकदा अपघाताचा धोका निर्माण होतो. या गोष्टींकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे.’’
- विकास पागिरे, वाहनचालक, चिखली

प्राणांतिक अपघात
२०२२
महिना ः अपघात
जानेवारी ः २७
फेब्रुवारी ः ३७
मार्च ः १६
एप्रिल ः २७
मे ः २५
जून ः ३०
जुलै ः २३
ऑगस्ट ः ३२

सप्टेंबर ः २९
ऑक्टोबर ः ३३
नोव्हेंबर ः ३८
डिसेंबर ः २९

२०२३
जानेवारी ः २६
फेब्रुवारी ः २६
मार्च ः ३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com