कॅश नसेल तर... क्यूआरकोड स्कॅन करण्याची वाहनचालकांकडे मागणी

कॅश नसेल तर... क्यूआरकोड स्कॅन करण्याची वाहनचालकांकडे मागणी

पिंपरी, ता. २ : रोख रक्कम नसेल तर, सर्रास सर्व ठिकाणी डिजिटल पेमेंटशिवाय पर्याय उरलेला नाही. अशिक्षित असूनही हातगाड्या व भाजी विक्रेत्यांकडेही आता ‘क्यूआरकोड स्कॅन’ करण्याची पद्धत रुजत चालली आहे. मात्र, आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये तृतीयपंथी देखील भीक मागताना सिग्नलवर सर्रासपणे दुचाकी व चारचाकी चालकांकडे ‘सुटे पैसे नाहीत’, असे म्हटले तर; ‘डिजिटल पेमेंट’ करण्याचा आग्रह करताना दिसून येत आहेत. ‘कॅशलेस’ जमान्यात त्यांनी देखील आता हा आधुनिक पर्याय स्वीकारल्याचे नजरेस पडत आहे.

शहरात तृतीयपंथीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोजगाराविना त्यांची फरपट होत आहे. यातील अनेकजण पदवीधर व उच्चशिक्षित आहेत. परंतु, केवळ तृतीयपंथी असल्याने अनेक ठिकाणी काम नाकारले जात असल्याचा अनुभव अनेक जणांना येत आहे. अनेकांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरविले असून त्यांना किरकोळ व्यवसायाची संधीही मिळत नाही. अशावेळी सिग्नलवर भीक मागून पोट भरल्याशिवाय रोजची गुजराण होत नाही. त्यासाठी दिवसभर भर उन्हात पायपीट करुन ते पोट भरण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत.

अनेक तृतीयपंथी उमेदवार ठरलेल्या सिग्नलवर उभे राहत असल्याने त्यांचे नियमित वाहनचालकांचे चेहरे पाठ झाले आहेत. अशावेळी वाहनचालकांना ते बोलून दाखवीत आहेत की, ‘रोज या रस्त्यावरून जातो. पण, पैसे देत नाही.’ अशावेळी अनेकजण चालक रोख रक्कम जवळ नसल्याचे सांगताना दिसून येत आहे. परंतु, यावर तृतीयपंथीयांनी देखील आता शक्कल लढविली असून मोबाईलवर व ‘हॅंडी क्यूआरकोड’ जवळ बाळगलेले चौकाचौकात दिसून येत आहे. अनेकजण आत्ता हा फंडा सर्रास वापरताना दिसून येत आहे.
---
माझ्या नोकरीमुळे मी दैनंदिन वाकडवरुन हिंजवडीला जात असतो. त्या दरम्यानच्या सर्व सिग्नलवर रोज तृतीयपंथी असतात. ५० ते ६० सेकंदाच्या कालावधीत खिशातून नोट काढून देण्यासही वेळ नसतो. मी नियमित पैसे देत नाही. परंतु, मोबाईल खिशात वरच असतो. रोख रक्कम नाही असे सांगितल्यावर तृतीयपंथी आता सर्रास ‘क्यूआर कोड’ समोर करून स्कॅन करायला लावत आहेत. त्यामुळे, हे दृश्य आता सर्रास नजरेस पडत आहे.
- सुशांत, वाकड
--
मी रोज पिंपरी चिंचवडमध्ये मागून पैसे आणत असतो. अनेक जण पैसे देत नाहीत. कारणे सांगतात. परंतु, आमच्यातीलही काही जणांचे शिक्षण झालेले नाही. त्यांना मोबाईल चालविता येत नाही. त्यांना ‘क्यूआर कोड’ वापरता येत नाही. परंतु, जे शिक्षित आहेत. ते सर्रास आता ‘क्यूआरकोड’ द्वारे पैसे घेत आहेत. सुट्टे पैसे किंवा माघारी पैसे वळती करून देण्याची काळजी नाही. सिग्नलवरही जास्त वेळ कोणी थांबत नसल्याने पैसे माघारी करण्याची काळजी नसते.
सोनू, तृतीयपंथी, पिंपरी-चिंचवड
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com