

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : लग्न म्हटलं की लग्नपत्रिका छापून घरोघर वाटण्याची प्रथा आहेच. कालपरत्वे मोबाईलवरून निमंत्रण देण्याची प्रथा सुरू झाली. मग व्हाटस्अपद्वारे निमंत्रण सुरू झाले. आता वाढदिवसाप्रमाणेच लग्नपत्रिकाचा फ्लेक्स करुन गाव व परिसरातील सर्वांनाच निमंत्रण देण्याचा नवा ट्रेंड रूजू लागला आहे. वधू-वराच्या घराजवळच्या मुख्य चौकात, असे मांडव डहाळ आणि विवाह समारंभाचे मोठमोठे ‘फ्लेक्स’ झळकू लागले आहेत.
आनंदाचा क्षण हातोय ‘इव्हेंट’
कुठलाही आनंदाचा क्षण ‘इव्हेंट’ म्हणून साजरा करण्यासाठी विवाह समारंभात देखील नवे-नवे ‘ट्रेंड’ रूजू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सध्या भोसरी, नेहरूनगर, रहाटणी, रावेत, काळेवाडी, देहूगाव, मोशी, दिघी, चिखली या परिसरात लावलेल्या मांडव डहाळ आणि विवाह समारंभाचे मोठाले ‘फ्लेक्स’च्या चर्चा रंगल्या आहेत. यावर दोन हजारांपासून ते २० हजारांपर्यंत खर्च हौशी करू लागले आहेत. अशा ‘फ्लेक्स प्रिंट’ काढून लग्नाच्या ठिकाणी देखील लावण्यात येत आहेत. काही ‘फ्लेक्स’वर वधू आणि वर याचे फोटोदेखील छापण्यात येत आहे.
सर्वांनाच निमंत्रण
लग्नाच्या धावपळीत अनेकदा परिचित लोकांना निमंत्रण पत्रिका देण्याचे राहून जाते. मग त्यांना निमंत्रण कसे जाईल? म्हणून हल्ली सर्वत्र परिसरातील सर्वच परिचितांना आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिकेचे ‘फ्लेक्स’ची १० बाय १५ फूट, २० बाय ४० फूट या आकारात छपाई करण्यात येत आहे. आपापल्या मुलांच्या विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एकच लग्नपत्रिका तयार करुन पंचक्रोशीतील सर्वांनाच उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मांडव डहाळेची ‘क्रेझ’
मांडव डहाळे हा कार्यक्रम लग्नाअगोदर होतो. ज्याच्या घरी लग्न आहे. त्यांच्या दारासमोर एक मांडव टाकला जातो. त्या मांडवावर छत म्हणून लिंब, उंबर, वड, आंबा आदी झाडांच्या डहाळ्या (फांद्या) टाकतात. त्यास ‘मांडव डहाळे’ म्हणतात. हे ‘मांडव डहाळे’ बैलगाडीतून घेऊन येतात. शक्यतो हे डहाळे मुलामुलींचे मामा आणतात. त्यांना पूर्वी पिठलं भाकरीचं जेवण द्यायचे. काही हौशी लोक हळदीच्या अगोदर हा कार्यक्रम घेतात व जवळच्या नातेवाइकांना जेवणही देतात. या बैलगाड्या ओवाळायला ज्या स्रिया येतात. त्या जी गाणी म्हणतात, त्यास ‘मांडव डहाळ्याची’ गाणी म्हणतात. उदा. ‘‘सोन्या रुप्याच्या कुऱ्हाडी, गेल्या ईंजान्या डोंगरी । डहाळं तोडी महादेव’’ अशी गाणी गायली जातात. बैल व गाडीवानाची विधीवत पूजा करुन त्याला मान दिला जातो. टोपी, टॉवेल, फेटा, नारळ ऐपतीप्रमाणे मान दिल्यावर गाडीतील डहाळ्या मांडवावर टाकतात. या गीतास विधीगीत म्हणतात. आता लग्नाच्या वरातीवर रात्री दहानंतर निर्बंध लादल्यामुळे ‘मांडव डहाळे’ व त्यात गाण्यांवर नृत्याचा कार्यक्रम याची ‘क्रेझ’ वाढली आहे. त्यासाठी काही जणांनी २५ बैलगाडीतून डहाळ्या आणल्या, असे रहाटणीतील गणेश नखाते यांनी सांगितले.
अटींचाही ‘फ्लेक्स’
पुणे जिल्ह्यातील मंचर इथे हा विवाह पार पडलेला आहे. विशेष म्हणजे या विवाहात नवरदेव आणि नवरीने एकमेकांसमोर सहा वेगवेगळ्या अटी ठेवलेल्या होत्या. साक्षीदार म्हणून या जोडप्याच्या मित्र-मैत्रिणींनी देखील त्यात सह्या केल्या होत्या. ते मान्य झाल्यानंतर हा विवाह पार पडला. त्या अटींचा ‘फ्लेक्स’ करुन लग्नाच्या ठिकाणी देखील लावलेला होता. त्यामुळे या विवाहाची ‘सोशल मीडिया’ जोरदार चर्चा सुरू झाली होती.
T42076, T42077
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.