शिधापत्रिकेत दुरूस्ती करण्यासाठी

शिधापत्रिकेत दुरूस्ती करण्यासाठी

Published on

शिधापत्रिका दुरुस्तीसाठी हेलपाटे

महात्मा फुले योजना ः तीन महिन्यांपासून गैरसोय

पिंपरी, ता. ८ ः ‘‘गेल्या तीन महिन्यांपासून शिधापत्रिकेत दुरुस्ती करण्यासाठी हेलपाटे मारत आहे. माझे पतीचे हिमोग्लोबीन सातच्या खाली आले आहे. ते दवाखान्यात दाखल आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गंत उपचारात सूट मिळावी, यासाठी शिधापत्रिकेची आवश्‍यकता आहे. पण मला शिधापत्रिकेसाठी धावपळ करावी लागत असल्याची वस्तुस्थिती मावळातील नंदा वंजारी यांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीकडे मांडली. त्यांच्याप्रमाणे शेकडो नागरिक शिधापत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, उपचारांसाठी शिधापत्रिकेची गरज नसल्याची माहिती निगडी अन्न परिमंडळ अधिकारी सांगत आहेत. परिणामी, नागरिकांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे.
निगडी येथील शिधापत्रिका कार्यालयांतर्गत परिमंडळ ‘अ’ व ‘ज’ कामकाज चालते. शासन नियमानुसार एक महिन्यातच शिधापत्रिका मिळणे अपेक्षित आहे. पण सध्या या कार्यालयात शेकडो नागरीकांच्या अर्ज पडून आहेत. अनेकांचे अर्ज गहाळ होण्‍याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शिधापत्रिका मिळविण्यासाठी नागरीक हेलपाटे मारत आहे. कार्यालयातील कर्मचारी साहेब नसल्याचे कारण सांगत नागरीकांना हेलपाटे मारण्यास सांगत आहे. वेळेत शिधापत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी, वैद्यकीय, शाळा प्रवेश रखडलेले आहे. आजारावरील उपचारात सवलत मिळत नसल्याची वस्तुस्‍थिती आहे.

लाभार्थी काढताहेत झोपून रात्र
शिधापत्रिका मिळविण्यासाठी लाभार्थी निगडी कार्यालयाबाहेर झोपून रात्र काढत असल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. विद्या वानखेडे आणि प्रणिता मिश्रा अशा नावाच्या लाभार्थी पूर्वी शहरात राहत होत्या. त्या आता नागपुर आणि लातूर याठिकाणी राहत आहेत. इकडचे कार्ड रद्द करून गावाला दाखला नेण्यासाठी वानखेडे आल्या होत्या. पण ऑनलाइन यंत्रणा बंद होती, सर्व्हर डाऊन असल्यामुळे कार्डचे काम झाले नाही. त्यामुळे त्यांना कार्यालयाबाहेर झोपून रात्र काढावी लागली.

अर्ज होताहेत गहाळ
गेल्या तीन महिन्यांपासून शिधापत्रिकासाठीचे अर्ज प्रलंबित आहे. पण कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षामुळे काहींचे अर्ज गहाळ झाले आहेत. अर्ज करण्यासाठी भाडेकरूनां घर मालकाचे संमतीपत्र, प्रतिज्ञापत्र, विभक्त राहत असल्यात त्यांचे संमतीपत्र द्यावे लागते, अशाप्रकारे मोठ्या दिव्यातून अर्ज करावा लागत आहे. पण याठिकाणी अर्ज गहाळ होत आहेत. पिंपळे गुरवमधील सुजाता कणसे यांनी कागदपत्रातील त्रुटी दूर करून अर्ज केला. पण त्यांचा अर्ज गहाळ झाला असून, त्यांना पुन्हा सोमवारी (ता. १०) बोलवले आहे. अशा प्रकारे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


‘‘मी दोन महिन्यांपासून शिधापत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी फेऱ्या मारत आहे. पण कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर ऐकायला मिळत आहे.’’
- नंदा जगदाळे, लाभार्थी

‘‘शासकीय योजनांचा लाभ घेण्‍यासाठी शिधारपत्रिकेची गरज आहे. पण वेळेत मिळत नसल्याने काय करावे कळेना.’’
- अंध प्रसाद वेदपाठक, लाभार्थी


‘‘शिधापत्रिकेची दवाखान्यात उपचारासाठी गरज नाही. याविषयी काही शासनाचे आदेश नाहीत. मुख्य सचिवांच्या सहीनंतरच शिधापत्रिकेचा वापर इतर कामासाठी वापर करावा लागतो.दवाखान्यात शिधापत्रिका मागण्यासाठी सरकारचे अध्यादेश आहेत का? असेल तर नागरिकांनी दाखवावेत.’’
- प्रशांत खताळ, परिमंडल अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.