कल्याणकारी योजनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

कल्याणकारी योजनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

Published on

पिंपरी, ता. ७ ः महापालिका समाज विकास विभागांमार्फत महिला व बालकल्याण योजना राबविण्यात येत आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मुखपृष्ठावरील ‘समाज विकास विभाग योजना’ या पर्यायावरून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत बारावीनंतरचे प्रथम वर्ष वैद्यकीय योजनेंतर्गत (एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयुएमएस), बी.आर्किटेक्चर, बीपीटीएच, बी. फार्म, बीव्हीएससी आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी २५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. रामभाऊ म्हाळगी योजनेअंतर्गत मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी आयटीआय विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये, अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये, एसएससी बोर्ड अंतर्गत दहावीतील मुलींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी सहा हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. अटलबिहारी वाजपेयी योजनेअंतर्गत विधवा, घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यास २५ हजार रुपये किंवा प्रशिक्षण घेतले नसल्यास १५ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळणार आहे. मदर तेरेसा योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला संस्थांना किंवा महापालिकेकडील नोंदणीकृत अनुदान प्राप्त महिला बचतगटांना पाळणाघर सुरू करण्याकरिता प्रारंभिक मूलभूत खर्चासाठी १० हजार रुपये आणि त्यानंतर इतर खर्चासाठी दर सहामाहीस १२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळेल. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्यांना २५ हजार रुपये आणि त्यांच्या मुलींना महर्षी धोंडो केशव कर्वे योजनेअंतर्गत संसार उपयोगी साहित्यासाठी २५ हजार रुपये अर्थसाहाय्य, तसेच, विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत २५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

अशाही काही योजना
- आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना सायकल घेण्यासाठी सात हजार रुपये अर्थसाहाय्य
- सामाजिक संस्थांना सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी २५ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह
- प्रमोद महाजन योजनेअंतर्गत परदेशातील उच्चशिक्षण वा अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस प्रथम वर्षासाठी दीड लाख रुपये
- बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत पहिल्या मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस २५ हजार रुपये मुदत ठेव स्वरूपात देणार
- दोन वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचतगटास १५ हजार रुपये अर्थसाहाय्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.