शहरातील १५ जनावरांना लम्पीचा संसर्ग
उपायुक्त खोत यांची माहिती; लक्षणे दिसल्यास औषधोपचार करण्याचा सल्ला

शहरातील १५ जनावरांना लम्पीचा संसर्ग उपायुक्त खोत यांची माहिती; लक्षणे दिसल्यास औषधोपचार करण्याचा सल्ला

पिंपरी, ता. ११ ः वातावरणातील बदलामुळे जनावरांमध्ये लम्पीचा संसर्ग आढळून येत आहे. हा विषाणूजन्य चर्म रोग असून, जलदगतीने प्रसारित होणारा साथीचा आजार आहे. त्यामुळे पशुपालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी केले आहे. गेल्या महिनाभरात सुमारे १५ जनावरांना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले असून, त्यांच्यावर औषधोपचार केले असल्याचेही खोत यांनी सांगितले.
कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे लम्पीचा संसर्ग होतो. जनावरांच्या अंगावर १० ते २० मिलिमीटर व्यासाच्या गाठी येणे, सुरवातीस भरपूर ताप, डोळे व नाकातून चिकट स्त्राव, चारा कमी खाणे, पाणी कमी पिणे अथवा बंद होणे, दूध उत्पादन कमी होणे, काही जनावरांच्या पायावर सूज येणे, लंगडणे अशी लम्पीची लक्षणे आहेत, असे सांगून खोत म्हणाले, ‘‘लम्पी संसर्ग डास, चावणाऱ्या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा व पाणी यामुळे होतो. पशुपालकांनी, चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तत्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी, डास, माश्या, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करून, बंदोबस्त करावा, निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणून औषध लावावे, गोठ्यांमध्ये फवारणी करावी, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करावा, त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे.’’

जनावरांना होणारा लम्पी हा संसर्गजन्य आजार आहे. योग्य काळजी व वेळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधे दिल्यास आणि वेळेवर उपचार केल्यास हा रोग निश्चित बरा होतो. संसर्ग झालेले एक-दोन जनावरे दिवसाला शहरात आढळत आहेत.
- संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, महापालिका
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com