शहरातील ८९.२२ टक्के लोक साक्षर

शहरातील ८९.२२ टक्के लोक साक्षर

Published on

पिंपरी, ता. २६ ः शहरातील ८९.२२ टक्के लोकसंख्या साक्षर आहे. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण ९२.४१ टक्के आणि स्त्रियांचे प्रमाण ८५.३७ टक्के आहे, असे महापालिकेच्या २०२२-२३ च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात नमूद केले आहे. पर्यावरण विभागातर्फे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे मंगळवारी अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये शहरातील विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन अहवालात असल्याचा दावा पर्यावरण विभागाने केला आहे.
महापालिकेची विशेष बैठक प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२५) झाली. पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रामुळे इंद्रायणी प्रदूषित
नदीमध्ये जाणारे सांडपाणी, निर्माल्य, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. मुळा नदी ही पवना व इंद्रायणी नद्यांच्या तुलनेत कमी प्रदूषित दिसून येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले नदीला मिळतात. इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने ती प्रदूषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात आहे.

सकारात्मक निष्कर्ष
- महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ
- २०२२-२३ मध्ये ई-वाहन वापरण्यावर नागरिकांचा भर
- वाहतूक, रोजगार, व्यापार, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक सुविधांमुळे शहराला पसंती
- सरासरी तापमान २५.५ अंश सेल्सिअस; कमाल ३६ व किमान ११ अंश सेल्सिअसची नोंद

नकारात्मक निष्कर्ष
- कोरोनामुळे श्वसन विकाराचे रुग्ण व डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
- मागील तीन वर्षांच्या तुलनेत हवेतील धुलिकणांमध्ये वाढ
- शांतता व निवासी क्षेत्रात ध्वनीपातळी जास्त
- सण-उत्सवांच्या काळात विशिष्ट ठिकाणी ध्वनी पातळीत मानांकनापेक्षा वाढ

भविष्यात काय?
- वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोडींची समस्या वाढू शकते
- शहराचा विस्तार व वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढू शकते
- मेट्रोमुळे वाहतूक सुविधा सुलभ होऊन रस्त्यावरील ताण कमी होऊ शकतो
- पेट्रोल, डिझेलवरील वाहने सध्या ६७ टक्के असून, भविष्यात ई-वाहने सात टक्क्यांपेक्षा अधिक होतील

शहरातील रुग्णसंख्या
दैनंदिन बाह्यरुग्ण ः ४,३५७
वर्षभरात आंतररुग्ण ः ५३,१४४

‘‘पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात महापालिकेचे विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांकडून प्राप्त पर्यावरणविषयक माहिती आहे. स्कायलॅब संस्थेने केलेल्या वायू, ध्वनी व जल तपासणीचे अहवाल आहेत. शहरवाढीला चालना देणारे घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती, नागरी सुविधांवर पडणारा ताण, पर्यावरण सद्यःस्थिती, त्यातील सुधारणांसाठी उपाययोजना आणि कृती कार्यक्रमांची माहिती अहवालात आहे.’’
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

‘‘शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरित क्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. त्यांचे व्यवस्थापन करताना शहराचे पर्यावरण व नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल महत्त्वाचा ठरतो. शहराच्या शाश्वत व पर्यावरणपूरक विकासासाठी अहवाल दिशादर्शक ठरेल.
- शेखर सिंह, प्रशासक तथा आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.