विद्यार्थ्यांना डीबीटी कधी मिळणार?

विद्यार्थ्यांना डीबीटी कधी मिळणार?

Published on

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २७ : शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी मोठा गाजावाजा करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) करण्याचा बहुप्रतिक्षित निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्याप निम्म्‍याहून अधिक विद्यार्थ्‍यांच्या खात्यावर अनुदान प्राप्त झालेला नाही. हे अनुदान मिळेल किंवा नाही याबाबत महापालिका स्तरावर कोणतीही हालचाल नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्राथमिक विभागातील सुमारे वीस हजार विद्यार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, काही शाळांमध्ये वह्याविना अन् दप्तराविना विद्यार्थी दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महापालिका शिक्षण विभागातून शालेय साहित्य खरेदीसाठी ठेकेदारामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जायचा. पण गेल्या वर्षापासून महापालिकेने रोख थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी या वर्षापासून होत आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे ३८ हजार ६३३ विद्यार्थ्यांची पट संख्या आहे. थेट लाभ हस्तांतरांमुळे स्वेटर, दप्तर, शूज-मोजे, वह्या, व्यावसायिक पुस्तके, कंपासपेटी, रेनकोट, शालेय बूट, वॉटर बॉटल, फुटपट्टी, चित्रकला वही, भुगोलवही, प्रयोगवही आदी वस्तू रूपात साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत. परंतु महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप बॅंकखाते उघडण्यात आले नाही.

शालेय साहित्य कधी विकत घेणार?
महापालिकेच्या कल्याणकारी योजनेत ‘डीबीटी’ कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. लाभार्थींना वेळेत वस्तू विकत घेण्यासाठी रक्कम खात्यावर जमा होणे आवश्‍यक आहे. पण अद्याप बहुतांश विद्यार्थ्‍यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ जमा झालेली नाही. शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला, तरी अद्याप शालेय साहित्य खरेदी झालेली नाही, अनुदान कधी मिळणार, अशी विचारणा पालक वर्गातून होऊ लागली आहे.

एकवीस हजार २६२ विद्यार्थ्यांना लाभ
अनुदानाच्या पहिल्या आणि दुसरा टप्‍प्यात २१ हजार २६२ विद्यार्थ्यांना लाभ दिल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. पहिल्या टप्प्यात चार हजार शंभर तर; दुसऱ्या टप्प्यात १७ हजार १६२ विद्यार्थ्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील सहा हजार ८२० विद्यार्थ्‍यांच्या रकमेचा धनादेश प्राप्त झाला असून, लवकरच खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती शिक्षण विभागातून दिली आहे.

बावीसशे विद्यार्थ्यांचे बॅंकखाती चुकली
लाभ मिळालेल्या २१ हजार २६२ विद्यार्थ्यांपैकी महापालिकेच्या ८५ शाळांतील २,२०० विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची माहिती चुकीची असल्याची आढळून आली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची यादी पाठविण्यात आली आहे. शाळेला माहिती प्राप्त झाल्यावर त्वरित रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर पाठविण्याचे प्रयोजन करण्‍यात येणार आहे.

एकोणतीस हजार विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश
संबंधित कंत्राटदाराचा गणवेश वाटपाचे कामाचा करार असल्यामुळे महापालिकेने या साहित्याचा समावेश ‘डीबीटी’मध्ये केलेला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत २९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले आहेत. उर्वरित शाळांमध्ये पंधरा दिवसांत वाटप पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

इयत्ता ः ‘डीबीटी’ (लाभाची) रक्कम
- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ः ३५०० रुपये
- पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ः ३७०० रुपये

‘‘महापालिकेकडून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. काही विद्यार्थ्यांकडून बॅंक खात्यांची माहिती चुकीची आढळून आली आहे. त्यामुळे खात्यांची पुर्नतपासणी करण्यात येत असून, लवकरच ‘डीबीटी’ लाभ मिळेल.’’
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.