‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय आरोग्यासाठी घातक
जीवनशैलीतील बदल कारणीभूत ः लठ्ठपणा, मधुमेह याबरोबर ह्रदयरोगालाही निमंत्रण

‘वर्क फ्रॉम होम’ ठरतंय आरोग्यासाठी घातक जीवनशैलीतील बदल कारणीभूत ः लठ्ठपणा, मधुमेह याबरोबर ह्रदयरोगालाही निमंत्रण

पिंपरी, ता. २७ ः कोरोना काळात सुरक्षिततेसाठी सुरु करण्यात आलेले ‘वर्क फ्रॉम होम’ आता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली मंदावल्यामुळे कर्मचाऱ्यांना मधुमेह, लठ्‍ठपणा, तणाव यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना काळात आयटी व इतर क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय दिला होता. कोरोना काळात घरी बसून काम करणे सुरक्षित असल्याने या संकल्पनेचे कौतुक झाले. मात्र, कोरोनाची साथ ओसरल्यानंतरही काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु ठेवले आहे. घरून काम असल्याने कामाचे वाढलेले तास, त्यामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, व्यायामाची कमतरता, सहकाऱ्यांशी कमी झालेला संवाद या सगळ्याचे दुष्परिणाम आता नोकरदारांच्या आरोग्यावर दिसू लागले आहेत.
‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेत कामाचे तास वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन ढासळू लागले आहे. घरूनच काम असल्याने स्वयंशिस्त राहिली नाही, खाण्याच्या वेळा व सवयी बदलल्या. कामानिमित्त होणारा प्रवास कमी झाल्याने इतरांशी संवाद बंद झाला. या सगळ्या बदलांमुळे घरून काम करणाऱ्या नोकरदारवर्गामध्ये पाठीचे विकार, पोटाचे विकार यांबरोबरच मधुमेह व ह्रदयविकारासारखे आजार उद्भवत आहेत, असे डॉ. अभिजित करमाळकर यांनी सांगितले. हे आजार जर टाळायचे असतील तर व्यायाम व कामाचे नियोजन, योग्य आहार व जीवनशैलीत आरोग्याच्या दृष्टीने बदल करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सुचविले आहे.

‘‘वाढलेल्या कामामुळे कमी झालेला संवाद, वेळेअभावी जंक फूडचे करण्यात येणारे सेवन, सतत संगणकासमोर बैठे काम करत असल्याने मंदावलेली पचनसंस्था या सगळ्याचे घातक परिणाम आरोग्यावर होत आहेत. हे टाळण्यासाठी योग्य व्यायाम व सकस आहार, स्वयंशिस्त हे बदल करणे गरजेचे आहे.
- डॉ अभिषेक करमाळकर


काय करावे
घरकाम व कार्यालयीन कामाचे नियोजन करावे
संगणकावर काम करताना बसण्याची पद्घत योग्य असावी
ठराविक वेळाने कामात ब्रेक घेऊन डोळ्यांचे व्यायाम करावे अथवा चालावे
नियमित व्यायाम व योगा करावा
आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी व प्रोटिनचे प्रमाण वाढवावे

काय टाळावे
काम करताना जंक फूड खाणे
झोपून अथवा जमिनीवर बसून काम करणे
सतत एका ठिकाणी बसून काम करणे
रात्री उशिरा खाणे
उशिरापर्यंत जागरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com