पिंपरी पवना पाणीसाठा

पिंपरी पवना पाणीसाठा

पवना धरण ः सोमवारी दुपारी चारपर्यंत ८६.८७ टक्के साठा

जुलै २०२४ पर्यंतची पाण्याची चिंता मिटली

पिंपरी, ता. ३१ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै अखेरपर्यंत २१८ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला असून, सोमवारी (ता. ३१) दुपारी चारपर्यंत ८६.८७ टक्के धरण भरले. गेल्या वर्षी हेच प्रमाण ८१.३० टक्के होते. सध्या उपयुक्त पाणीसाठा २०८.०९ मिलिमीटर असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो २.३० दशलक्ष घनमीटरने अधिक आहे. त्यामुळे शहराची ३१ जुलैपर्यंत २०२४ पर्यंतची काळजी मिटली आहे. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.

शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत सोडलेले अशुद्ध पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून वाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. शिवाय, ‘एमआयडीसी’कडून दररोज ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. इंद्रायणी नदीतून त्याचा उपसा करून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होलीसह अन्य भागात वितरित केले जात आहे.

दिवसाआड पुरेसे पाणी
सध्या २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जाते.

जुलैअखेरचा विचार
पवना धरणातील जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा विचारात घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याचा विचार केला जातो. त्यानुसार उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत विसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. पावसाळ्यात सांडव्यातून तर उन्हाळ्यात वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग केला जातो.

पावसाचा जोर ओसरला
धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी (ता. ३१) सकाळी सहा ते दुपारी चारपर्यंत अवघा नऊ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत हे प्रमाण अवघे २२ मिलिमीटर होते. शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहापर्यंत ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पवना धरण पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये ३१ जुलैची स्थिती)
वर्णन/ एकूण पाणीसाठा/ जिवंत पाणीसाठा / टक्केवारी
२०२३ / २३९.२२/ २०८.०९ / ८६.८७
२०२२ / २२६.९२ /१९५.७९ / ८१.३०
फरक / ००२.३० / ००२.३० / ५.५७ (अधिक)

पवना धरण क्षेत्रातील पाऊस (मिलिमीटरमध्ये ३१ जुलैची स्थिती)
एक जूनपासूनचा पाऊस ः १७९९ मिलिमीटर
गेल्या वर्षीचा पाऊस ः १५८१ मिलिमीटर
यावर्षी तुलनेने अधिक पाऊस ः २१८ मिलिमीटर
एकूण पाणीवाढ ः २.३० दशलक्ष घनमीटर

पवना धरणात सध्या एकूण पाणीसाठा २३९.२२ दशलक्ष घनमीटर आहे. एक जूनपासून आतापर्यंत एक हजार ७९९ मिलिमीटर पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.
- समीर मोरे, शाखा अभियंता, पवना धरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com