निगडीत आजपासून विचार प्रबोधनपर्व

निगडीत आजपासून विचार प्रबोधनपर्व

पिंपरी, ता. ३१ ः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेने पाच दिवसीय विचार प्रबोधनपर्व आयोजित केले आहे. निगडीतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील प्रांगणात मंगळवारपासून (ता. १) शनिवारपर्यंत (ता. ५) कार्यक्रम होतील. त्यात प्रबोधनात्मक चर्चासत्र, परिसंवाद, वृक्षारोपण, कीर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त सिंह यांच्या हस्ते मंगळवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. सकाळी अकरा वाजता निगडीतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचार प्रबोधन पर्वाला प्रारंभ होईल. त्यानंतर हलगी वादनाची जुगलबंदी होईल. प्रबोधनपर्व काळात सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत विविध कार्यक्रम होतील. यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे आदींचे सहकार्य लाभणार आहे. शनिवारी (ता. ५) रात्री साडेआठ वाजता सिनेकलाकार प्राजक्ता महामुनी व दीप्ती आहेर यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाचा समारोप होईल.

योजनांची माहिती
महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रबोधन पर्वात दिली जाणार आहे. शिवाय, रोजगार मेळाव्याचे आयोजनही केले जाणार आहे. विविध ठिकाणी पाचशे रोपे लावली जाणार आहेत.

महिलांसाठी उपक्रम
गुरुवारी (ता. ३) सकाळी साडेअकरा वाजता महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम होईल. अभिनेत्री गुरुमित कौर यांचे महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. तसेच, आरोग्यासाठी स्त्री-रोग तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

उद्योजकता मार्गदर्शन
महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभाग आणि ‘लाइट हाऊस’तर्फे उद्योजकता प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन होईल. विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाच्या संधी, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com