

घरफोड्या करणाऱ्या
टोळीचा प्रमुख जेरबंद
पिंपरी, ता. १८ ः घरफोड्या करणाऱ्या केआर टोळीच्या प्रमुखासह तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून बारा लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण गुरुनाथ राठोड (वय २६, रा. दिघी), अर्जुन कल्लाप्पा सूर्यवंशी (वय १९, रा. कोरेगाव भीमा), संतोष जयहिंद गुप्ता (वय १८, रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिघी परिसरात सापळा लावून, किरण राठोड याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोटार, १८७ ग्रॅम सोने, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, असा एकूण बारा लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या केआर टोळीच्या म्होरक्यासह तिघांना अटक करण्यात दरोडा विरोधी पथकाचे दिवंगत पोलिस अंमलदार राजेश कौशल्ये यांचा सिंहाचा वाटा होता. राजेश यांना मिळालेल्या खबरीवरूनच सापळा रचून आरोपींना जेरबंद करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. गुरुवारी (ता. १७) पोलिस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. त्यावेळी दरोडा विरोधी पथकातील सहकाऱ्यांना राजेश यांच्या आठवणी दाटून आल्या.
-------------
रावेतमध्ये मोटारीच्या धडकेत
अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव कारच्या धडकेत अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. बुधवारी (ता.१६) रावेत येथे हा अपघात घडला.
याप्रकरणी पोलिसांनी गणपती शिवाजी पाटील (रा तळेगाव दाभाडे) या मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भरधाव वेगात मोटार चालवून समोर जात असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यावेळी तेथून पायी जाणाऱ्या अनोळखी पादचाऱ्याला मोटारीने जोरदार धक्का दिला.
महिलेची ५० लाखांची फसवणूक
पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची पन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ या कालावधीत वाकड येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खासगी कंपनीचा व्यवस्थापक राहुल गुलाबसिंग जाखड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना जेसीबी कॅपिटल आणि जेसीबी ॲग्रोटेक या दोन कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखवले. फिर्यादी महिलेने पन्नास लाख रुपये चेकद्वारे आरोपीला दिले. या बदल्यात दोन कोटी परत करण्याचा करारनामा करण्यात आला. मात्र, फिर्यादी यांना कोणतीच रक्कम परत न करता आरोपीने फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
तळेगावात चार लाखांची फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन टास्कच्या बहाण्याने महिलेची तीन लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १३ ते १८ जुलै या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवार (ता. १६) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या फेसबुक वॉलवर घरबसल्या पैसे कमवण्याचा एक मेसेज आला. फिर्यादी यांना कामाची गरज असल्याने त्यांनी लिंकवर क्लिक करून नोंदणी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी सोबत संपर्क करून त्यांना वेगवेगळे टास्क दिले. फिर्यादी यांनी टास्क पूर्ण करण्यासाठी रक्कम भरली. परंतु, त्यांना मोबदला मिळाला नाही. अशा प्रकारे आरोपींनी त्यांची तीन लाख ९८ हजार २५० रुपयांची फसवणूक केली.
सांगवीत डॉक्टरची २७ लाखांची फसवणूक
पिंपरी : सांगवी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकेची विक्री करून एका डॉक्टरची २७ लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑक्टोबर २०१६ ते १६ ऑगस्ट २०२३
या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.
डॉ. सुरेश डोंगरसिंग नाईक (४३, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण शंकर गारवे, किशोर शंकर गारवे (दोघे रा. पिंपळे गुरव), यशवंत माधवराव बारहाते (रा. नगर) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.