शहरात नागपंचमीनिमित्त रंगली ‘झिम्मा फुगडी’

शहरात नागपंचमीनिमित्त रंगली ‘झिम्मा फुगडी’

पिंपरी, ता. २१ : अनेक ठिकाणी नागाच्या प्रतिकृतीची पूजा करून नागपंचमी (ता. २१) पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. नऊवारी, नथ, दागदागिन्यांचा साज घातलेल्या महिलांचा उत्साह... फुगड्यांचा फेर धरत, झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला. ‘चल गं सई वारुळाला’ असे म्हणत मोठ्या भक्तिभावाने घरीच नागमूर्ती आणून महिलांनी त्याचे पूजन केले.

श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिलाच सण त्यातच शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. आज सकाळपासून श्रावणसरींचा खेळ सुरू होता. या सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. तर, नागाच्या प्रतिकृतीला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला. स्त्रिया एकत्र येऊन झोके खेळणे, झिम्मा-फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळताना दिसून आल्‍या. चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे या ग्रामीण भागात महिलांची ‘झिम्मा-फुगडी’ रंगली होती. महादेवाच्या मंदिरात सर्वत्र गर्दी झाली होती. सकाळपासून पावसाची संततधार सुरू असतानाही महिलांचा उत्साह कमी झाला नाही.

सहा फूट उंच नागप्रतिमा
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर या ठिकाणी नागपंचमी उत्सव साजरा झाला. प्रतिष्ठानच्या वतीने सहा फूट उंचीची नागप्रतिमा तयार केली आहे. त्याचे पूजन तारा बहिरवाडे, अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक संदेश देण्यात आला. या ठिकाणी महिलांसाठी उंच झोका बांधला होता. श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने अनेक पारंपारिक खेळांच्या स्पर्धां घेण्यात आल्‍या. महिला मंडळाच्या नीलिमा भंगाळे, श्रद्धा बहिरवाडे, गीता पाटील, प्रीती झोपे, मीरा बिरादार, स्नेहल खडके, सविता राणे, दीपाली योगी, छाया सातपुते, मोहिनी शिराळकर, अश्विनी केवळकर, मनीषा भडंगे, नेहा अहिरे व मंगल काळे यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com