
महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांनी खडसावले
महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांनी खडसावले
- २४ तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा दिला ‘अल्टिमेटम’
पिंपरी, ता. ३० : भोसरी आणि परिसरातील वीज समस्यांसदर्भात प्रशासन बेजाबदारपणे वागत असून, २४ तासांत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहा. नागरिकांच्या आंदोलनाचे नेतृत्व मी स्वत: करेन, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
शहरात सोमवारी सोसाट्याचा वारा आणि गारांवा पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असून, मंगळवारी दुपारीपर्यंत वीज बंद होती. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या. या पाश्वभूमीवर आमदार लांडगे यांनी महावितरण कार्यालयात बैठक घेतली.
विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी बैठकीतून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. अधिकारी मनमानीपणे कारभार करीत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री कार्यालयातूनही महावितरणच्या कारभाराची झाडाझडती झाली.
मोशी, प्राधिकरण, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, चक्रपाणी वसाहत, इंद्रायणीनगर या भागातील वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. यापार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी महावितरण कार्यालयात धडक दिली. भोसरी पावर हाऊस येथील महावितरण कार्यालय येथे तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी महावितरणचे पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप, कार्यकारी अभियंता उदय भोसले यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या दोन वर्षांपासून हेतुपुरस्सर भोसरीकरांना वीज समस्या निर्माण केल्या जात आहेत. अनेकदा विनंती, निवेदने देवूनही महावितरणचे अधिकारी उद्धटपणे उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरण अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. महावितरणची जी कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे अपेक्षीत आहे. याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
- महेश लांडगे, शहराध्यक्ष, आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड.