भटक्या कुत्र्यांची कामगारांमध्ये दहशत
महापालिकेचे दुर्लक्ष ः रात्रपाळीवरून घरी जाताना अनेकांची तारेवरची कसरत

भटक्या कुत्र्यांची कामगारांमध्ये दहशत महापालिकेचे दुर्लक्ष ः रात्रपाळीवरून घरी जाताना अनेकांची तारेवरची कसरत

Published on

पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा उपद्रव मागील दोन वर्षात त्रासदायक ठरत आहे. शहरातील अनेक भागात रात्रपाळीवरुन येणाऱ्या कामगारांच्या अंगावर ही भटकी कुत्री टोळक्याने हल्ला करतात. त्यामुळे कामगारांना घरी जाताना कसरत करावी लागते. भटकी कुत्र्यांची त्यांच्यात दहशत पसरली आहे. मागील दोन वर्षापूर्वी कोरोना काळात महापालिका भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी र्निबिजीकरणासाठी सुमारे ६.५ कोटी रुपये खर्च केला होता. हा खर्च कोठे गेला, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

चिखली प्रभागातील जाधववाडी, मोशी, राजे शिवाजीनगर सेक्टर क्रमांक १६, कुदळवाडी तसेच या परिसरातील हौसिंग सोसायट्यांच्या आसपास चाळीत, चौकात, भाजी मंडई, चिकन मटण दुकानांच्या आसपास भटक्या कुत्र्यांची टोळकी उच्छाद करत वावरत असतात. असाच प्रकार सांगवीतील जयमालानगर, ममता नगर तसेच; थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, भोसरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, वाकड आदी भागातही दिसून येत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक वैतागले आहेत.
एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘डॉग व्हॅन’ कुत्री पकडण्यासाठी फिरायच्या. आता दोन वर्षे झाली ‘व्हॅन’ फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे भटकी कुत्री बिनधास्त झाली आहेत. महापालिका कायद्यानुसार, भटकी कुत्री बंदोबस्त व रेबीज उपचार यावर प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करून शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यापासून मुक्ती दिली पाहिजे. परंतु; हे महापालिकेकडून होताना दिसत नाही.
अमेरिका,ऑस्ट्रेलिया सारख्या देशात भटक्या कुत्र्यांसाठी सरकारी आश्रयस्थाने आहेत. ७२ तासात आश्रयस्थानातील कुत्री कोणी नेली नाही तर; त्यांना वेदनाविरहित मरण दिले जाते. आपल्या शहरात भूतदयावादी, श्वानप्रेमी लोक या भटक्या कुत्र्यांना खायला देतात. त्यामुळे तसेच चिकन-मटण वेस्टेज सहज मिळत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. शहरात तब्बल ७२ हजार भटकी कुत्री असल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने २०१९ दिली होती. ही संख्या वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २०१५ पासून दरवर्षी कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी एक कोटीहून जास्त रक्कम खर्च करत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी सांगितले.

‘‘शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी कोरोना काळात शहरात चिटपाखरू फिरत नसताना दररोज २ ते ४ हजार कुत्र्यांची शस्त्रक्रिया केल्याचे बोगस दाखवून सुमारे ६.५ कोटींचा गैरव्यवहार महापालिकेत झाला होता. हा गैरव्यवहार मी २०२१ मध्ये काढला होता पण पुढे काही झाले नाही.
- योगेश बहल, माजी महापौर.

शहरात सुमारे ८० हजार भटकी कुत्री आहेत. महापालिकेच्यावतीने ‘कॅनाईन कंट्रोल ॲंड केअर’ या संस्थेमार्फत या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरणाचे काम केले जात आहे. ऑगस्ट २०२२ ते आजपर्यंत सुमारे १८०० कुत्र्यांची शस्त्रक्रिया व लसीकरण झाले आहे. शस्त्रक्रियेसाठी व लसीकरणासाठी जादा पिंजऱ्यांची मागणी आम्ही केली आहे.
- डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

‘‘पिंपरी चिंचवड शहरात २०२२ मध्ये १० हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती उपलब्ध आहे. भटक्या कुत्र्यांना ‘रेबीज इन्फेक्टर’ असे संबोधून त्यांची शहरातील संख्या कमी करण्यासाठी प्राणी हक्क कायद्यात तरतूद करावी. भटकी कुत्री पकडून ती जंगलात सोडून द्यावी. भटकी कुत्री हा देशासाठी कोणत्याही सार्वजनिक हितासाठी उपयुक्त प्राणी नाही. भटके कुत्रे चावल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणजे या विषयाकडे गंभीरपणे बघितले जाईल.
- जितेंद्र निखळ, निवृत्त सैन्य अधिकारी, चिंचवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com