आषाढी वारी विशेषांक - खा.संजय जाधव

आषाढी वारी विशेषांक - खा.संजय जाधव

आषाढी वारी विशेषांक - खा.संजय जाधव, परभणी

राजकारण विरहीत वारी

इंट्रो - माणसाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी, असा त्याचा महिमा आहे. आपण पाहतो की, वयोवृद्ध, कुणी अंध, कुणी अपंग आहे. पोटभर खायची सोय नाही. झोपायची व्यवस्था नाही. पैसेही गाठीला नाहीत. पण, ते लोक जे काही निष्ठेने सेवा करतात, वारी करतात. त्याला तोड नाही.
---------------------------
माझ्या वारीला जवळपास सुमारे २६ वर्षे झाली. त्यातील दोन वर्षे कोरोना गेली. १९९७ पासून वारीला जात आहे. माझ्या कुटुंबाच वारीची परंपरा आहे. आमचे घराणेच वारकरी संप्रदायातील आहे. माझे आजोबांपासून वारी चालत आली आहे. आम्ही वेगळे असे काही करतो, असा भाग नाही. परंतु, माणसाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी, असा त्याचा महिमा आहे. त्यांच्याकडे बघिल्यावर आपल्याला वाटते की, ईश्वराने आपल्याला एवढी शरीरसंपत्ती चांगली दिली आहे. याच्या एवढी श्रीमंती आणखी कोणती असू शकते. वारी आत्ता करायची नाही तर करायची कधी ? जेव्हा, आपले अवयव सर्व कामी येणारे आहेत. त्यावेळेस, वारी न करता ते निकामी झाल्यावर वारी करणार आहात का तुम्ही ? काही लोक म्हणतात की, आपले वय आहे का ? तिकडे जायचं.. देवाचे नामस्मरण शेवटी शेवटी करायचे ! अरे पण, तुला वेळ मिळाला तर तू करशील ना ! इथे अचानक ह्दयविकाराचा झटका येऊन पटकन मेला तर तू काय घेऊन जाणार आहेस ? त्यामुळे, जो काही आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे. त्याच्या मदतीने समाजात चांगले कार्य करायला पाहिजे.

वारी हा श्रद्धेचा भाग
सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजात काम तर करतोच. पण, हा श्रद्धेचा भाग आहे. इथे तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे काम नोहे ॥... त्यामुळे, माणूस या क्षेत्रात आल्यावर किंवा त्याच्याशी समरस झाल्यानंतर त्याला संप्रदायाची ख्याती कळू शकते आणि महिमा समजू शकतो. एक जुनी म्हण आहे की, ‘ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला’.. आपण जोपर्यंत तिथे जाणार नाही. जोपर्यंत त्या वारीत तेथील लोकांशी समरस होत आनंद घेऊ, त्यावेळेसच आपल्याला कळेल की, वारीचा महिमा काय आहे ते ! ईश्वर सुद्धा या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात. ‘ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही’, असे म्हटले आहे. असा हा सोहळा पुढील वर्षी कधी येतो, त्याची वाट सर्वजण पहात असतात.

दैनंदिन व्यापातून वेळ काढा
राजकारणात किंवा दैनंदिन जीवनात वावरत असताना रोज सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत लोक समस्या मांडणारच. आपण बसणारच, बोलणारच ! परंतु, यातून सुद्धा आपण थोडा वेळ काढला पाहिजे. सोबत काही आणले नाही, काही नेणार नाही. वारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सगळ्या भजनी मंडळींशी एकरुप होता येते. मी देखील वारकरी संप्रदायातील असल्याने आणि धार्मिकतेची आवड असल्याने भजन करत वारीत चालत असतो. कधी गवळण, कधी अभंग म्हणताना जात असतो. त्या आनंदाचे विश्लेषण आपण करु शकत नाही. आपले १५-२० दिवस कसे निघून जातात, हे कळत सुद्धा नाही.

राजकारणापलीकडील ‘वारी’
वारी ही वारकऱ्याशी संबंधित झाली. त्यामुळे, इथे राजकारणाचा संबंध येत नाही. वारीमध्ये लहान-मोठा, गरीब-श्रीमंत सर्वजण सारखेच... ‘माऊली’ म्हणून एकमेकांना संबोधले जाते. कुणी कुणाला नावाने बोलवत नाही. सर्व राग-लोभ, मद, मत्सर बाजूला ठेवून हे सर्वजण निष्ठेने आलेले असतात. आपल्याकडून ईश्वर सर्व करुन घेत असतो. आपण केवळ निमित्त मात्र ठरतो. विठ्ठलाच्या ओढीने त्याला भेटायला जायचे आहे. एवढ्या अपेक्षेपेक्षा दुसरे काही आहे, असे वाटत नाही. वारीत राजकीय क्षेत्रातील लोकही येत असतात. त्यांच्यासोबत वारी करत आलो आहे. इथे पक्ष म्हणून कोणी येत नाही. वारकरी म्हणून येत असतात. इथे श्रद्धेला स्थान आहे. तिच्या शिवाय दुसरे काही असू शकत नाही. मी सुद्धा इथे येताना आवश्यक त्या सूचना करत असतो. तातडीच्यावेळी दूरध्वनीवरुन संपर्क साधत असतो. सासवडला पालखी मुक्कामी असताना एका बैठकीसाठी जावे लागले. पुण्यात गेलो. तेथून विमानाने दिल्लीला गेलो. परत संध्याकाळच्या विमानाने परत सासवडला आलो. थोडक्यात म्हणजे, तडजोड हे जीवनाचे दुसरे नाव आहे. रोजच्या जीवनातील संघर्षाचा सामना रोजच करायचा आहे . ही लढाई संपणारी नाही. चालतच राहणार आहे. परंतु, आपल्या सर्वांना मनः शांती देखील हवी आहे.
आज सोहळ्याला गेलो की, परत पुढच्या वर्षीच यायला मिळेल. म्हणून थोडा वेळ काढलाच पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com