वारीतून रांगोळीदर्शन

वारीतून रांगोळीदर्शन

Published on

वारीत रांगोळीतून कलेचे दर्शन

आषाढी वारीत रांगोळ्या काढून मला काय समाधान मिळते, हे शब्दांत सांगता येणार नाही. एवढंच कळतं की, वारी जवळ आली आहे. वारीला जायचं आहे. पहिल्यांदा रांगोळी काढल्यावर असे वाटायचे की, पालखी रांगोळ्यांवरुन जाण्यापूर्वीच पुसली जाते. मात्र, कालांतराने मनात असाच एक भाव निर्माण झाला की, वारकऱ्यांच्या रूपाने रांगोळी माऊलींच्या पायी जात आहे. आता, वारकऱ्यांनी रांगोळी तुडवली काय किंवा माऊलींच्या पायी गेली काय, माझी सेवा रुजू झाल्यासारखे वाटते.
- राजश्री जुन्नरकर-भागवत, पुणे
----------------------------------
जवळपास बारा वर्षांपूर्वी मी वारीला सुरवात केली. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत रांगोळी काढत असे. त्यावेळी मी घरी इतरांप्रमाणे रांगोळ्या काढत असे. त्याचा कुठे क्लास लावला नाही. स्वतः शिकले. ही मी परमेश्वराची देणगीच असल्याचे मानते. असेच एकदा मी वडिलांना म्हणाले की, मला वारीला जायचंय, रांगोळी काढायची आहे. सर्वजण म्हणाले, ‘‘खूप गर्दी असते. शक्य होणार नाही.’’ त्यावेळेस, मी खूप लहान होते. माझे वय १३-१४ वर्षे असेल. तेव्हापासून वारीला सुरवात झाली. वडिलांनी स्कुटीवरुन रांगोळी काढायला प्रारंभ केला. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत! त्यावेळेस, आम्ही दिंडीत राहून स्कुटीवरुन जात रांगोळी काढत जायचो. अजूनही मी स्कुटीवरच जाऊन रांगोळी काढते. आता, सोबत मोठी गाडी असते. किमान चारशे-साडेचारशे किलो रंग असतात. यंदा जास्त म्हणजे सुमारे पाचशे किलो रंग घेतले आहेत. रांगोळी ८५ ते ९० पोती असते. एवढे साहित्य घेऊन पालखी मार्गावर रांगोळी काढत असते. त्यासाठी माझ्या वैयक्तिक खर्चाबरोबच त्यासाठी मला काही दानशूर व्यक्तींची मदत होत असते.

रांगोळी न काढल्याची रुखरुख
वारीच्या एक-दोन महिने अगोदरच आमचे कसे नियोजन करायचे, यादृष्टीने विचारविनिमय चालू होतो. आम्ही रांगोळी काढून कला सादर करीत असतो. आमच्याशी ती परंपरा बांधली गेली आहे. त्यात स्वतःचे काहीतरी देत असतो. नाही केले तर काही चुकल्यासारखे वाटत असते. कोविडच्या काळात आम्ही प्रस्थानला रांगोळी काढली. आम्हाला पंढरपुरात मंदिरातही रांगोळी काढायला मिळणार होती. परंतु, आमच्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याने आम्हाला त्यावेळी केवळ प्रस्थानालाच रांगोळी काढता आली. पंढरपूरला रांगोळी काढायला मिळाली नाही. त्यावेळी पंढरपूरला जायला मिळणार नाही म्हणून आम्हाला अक्षरशः रडू आले. एकंदरीत वारीची वाट माझ्यासाठी कला सादर करण्याचे व्यासपीठच आहे. ती संस्कृती दरवर्षी येऊन मी रुजविते. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. वारीच्या वाटेने काहीच कमी पडत नाही. त्यामध्ये माझ्यासारखे अनेक कलाकार वारीत येतात, आपली कला सादर करून जातात. मात्र, मी या वाटेने अखंड रांगोळीच्या पायघड्या घालते. माउलींची सेवा या निमित्ताने माझ्याकडून घडते, ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे, अशी माझी भावना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.