हरित वारी - शिवाजी महाराज मोरे
हरित वारी, पर्यावरण संगोपन करी
संत जसे माणसा-माणसांत भेदभाव करत नाहीत. तशी झाडेही भेदभाव करत नाहीत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।। माणसांप्रमाणेच वृक्षांचा, निसर्गाचा सांभाळ केला पाहिजे, हा पर्यावरण रक्षणाचा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला. याच जाणीवेतून पालखी महामार्गावर दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे रक्षण व संवर्धन करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्याअंतर्गत, मंगळवेढा ते पंढरपूर असा प्रायोगिक तत्वावरील ‘हरित वारी’ प्रकल्प राबविण्यात आला. यापुढेही सर्व संतांच्या पालखी मार्गांवर ‘हरित वारी’ची संकल्पना शासन व लोकसहभागातून राबविण्याचा आमचा मानस आहे.
- शिवाजी महाराज मोरे, सदस्य, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर.
-----------------------
पंढरीची वारी ही आपली प्राचीन, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. जगाच्या पाठीवर एकमेव अशी परंपरा आहे. ज्यामध्ये, कोणताही निरोप अथवा निमंत्रण न पाठविता एकाच तारखेला एकच वेळेला असंख्य वारकरी वारीत सहभागी होतात. ही आपली फार मोठी संघटितशक्ती आहे. यामध्ये सामूहिक शिस्त व आध्यात्मिक आनंद मिळतोच. परंतु, समाज संवर्धनासाठी या वारीचा चालता बोलता वापर झाला पाहिजे. प्रत्येक वर्षी या वारीतून विशिष्ट ‘थीम’ (संकल्पना) समाजाला दिली गेली पाहिजे. ज्या योगे ‘प्लास्टिक मुक्ती’, ‘वृक्षारोपण, ‘स्त्रीभ्रूण हत्या’ अशा सामाजिक विषयांवरील संकल्पना मांडता येतील.
हवामान बदलाची चिंता
सध्या वाढते तापमान पाहता पर्यावरणावर अधिक भर दिला पाहिजे. कारण, तो जागतिकदृष्ट्या ऐरणीवरचा विषय आहे. ‘हरित वारी’ ही प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट आहे. दर दोन वर्षांनी एक अंश सेल्सियस तापमान वाढत असल्याचा ‘आयपीसीसी’चा अहवाल आहे. पुढील पाच वर्षांत आणखी पाच अंशांनी तापमान वाढल्यास वारी करणे अशक्य होईल. त्यावर, उपाय म्हणून आपण अधिकाधिक देशी वृक्षांची लागवड केली पाहिजे.
‘हरित’ वारी संकल्पनेचा उगम
संत तुकाराम महाराज संस्थानवर २०११-१३ या काळात अध्यक्ष असताना ‘आपण पवित्र काम करतोय. मंदिरात काम करायचे तर चप्पल घालण्याची गरज काय ? असा विचार करून दोन वर्षे चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे, माझ्या दोन वाऱ्या अनवाणी झाल्या. वारकरी बनल्याशिवाय त्यांच्या समस्या समजणार नाहीत. त्यामुळे, अध्यक्षकाळात पूर्णपणे पायी चाललो. तेव्हा, मला प्रकर्षाने जाणवले की, हडपसरपर्यंत हवामान चांगले असते. परंतु, त्यापुढे पाऊस येत नाही. रस्त्यावरुन चालताना पाय भाजायचे. त्यावेळेस, मी पायाला अक्षरशः फडकी गुंडाळली होती. मग, चालताना कुठे झाडं आले की सावलीमध्ये पायांना गारवा लागायचा. त्यावेळी, असे वाटायचे की, इथे पालखी सोहळा थांबला पाहिजे. मग, अशा प्रकारचे सावली आच्छादित ‘हरित पालखी’ महामार्ग आपण का करू शकत नाही? असे मनोमन वाटले. त्यासाठी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली पाहिजे आणि अशा प्रकारे ही ‘हरित वारी’ची संकल्पना सुचली.
‘हरित’ पालखी महामार्गाची मुहूर्तमेढ
हरित वारी संकल्पनेतून १६ जून २०१७ ला श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, ‘वनराई’ पुणे, ‘देवराई’ तळेगाव ‘आपले पर्यावरण’ (नाशिक), ‘ अशा जवळपास २२ पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सहभागातून आम्ही ‘हरित’ पालखी महामार्गाची संकल्पना राबविण्यास सुरवात केली. तत्पूर्वी, देहू येथील इंद्रायणीच्या तीरावर वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते जवळपास ४० वृक्ष लावले आणि त्यांचे संवर्धन केले. आज ते वारकऱ्यांना आणि यात्रेकरूंना सावली देत आहेत. ‘हरित वारी’ अंतर्गत सुरवातीला आम्ही पालखी तळ ‘हरित’ करण्याचा प्रयत्न केला. मग, पंढरपूरच्या नवीन एसटी स्थानकावर जवळपास ८०० देशी झाडे लावली.
हजारो झाडे लावण्याचा संकल्प
तत्पूर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्मल वारीवर काम करत असल्याने राज्य सरकारने
माझी २०१८-१९ ला पंढरपूर मंदिर समितीवर नियुक्ती केली. तेव्हा, ‘हरित वारी’ उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ९८ हजार ९२३ झाडे लावण्याचा ठराव मंदिर समितीमध्ये केला. पंढरपूरला येणारे जवळपास दहा पालखी महामार्ग आहेत. आम्ही सुरवातीला दहा हजार वृक्ष लावता येतील, असा मंगळवेढा ते पंढरपूर २३ किलोमीटरचा मार्ग वृक्ष लागवडीसाठी निवडला. या उपक्रमासाठी सुमारे नऊ हजार दोनशे देशी झाडे सामाजिक वनीकरण विभागाने आम्हाला दिली. लावलेल्या वृक्षांच्या संरक्षणासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संरक्षण जाळ्या मिळाल्या. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडून वृक्षांना पाणी देण्यासाठी टॅंकरचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे शासन आध्यात्मिक संस्था व लोकसहभाग यातून एक हरित पालखी महामार्गाची संकल्पना यशस्वी झाली. यावर्षी ज्ञानोबा व तुकोबारायांच्या दोन्ही पालखी महामार्गावर शासनाच्यावतीने दुपारचा विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी दहा हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.