मतदान करूया! लोकशाहीचा धागा होऊया!
पिंपरी, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थांबल्या आहेत. राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काम केलेले आहे. आता वेळ आहे लोकशाहीचा ‘राजा’ असलेल्या मतदारांची, बुधवारी (ता. २०) होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची. प्रत्यक्ष मतदान करण्याची आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याची. चला तर मग, मतदान करूया! लोकशाहीचा धागा होऊया.!
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. त्यात शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघातील एक हजार ४५४ मतदान केंद्र असून १६ लाख ६३ हजार ६५४ नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभागाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी आवश्यक साहित्यासह मंगळवारी (ता. १९) दुपारीच आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभाग आणि महापालिकेने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले आहेत. निवडणूक विभागाने प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी सहा मतदान केंद्र लक्षवेधी केली आहेत. यामध्ये युनिक, युवा, महिला, दिव्यांग, परदानशीन आणि मॉडेल अशी मतदान केंद्रांची वर्गवारी केली आहे. महापालिका शहरातील तीनही मतदारसंघातील प्रत्येकी पाच या प्रमाणे १५ मतदान केंद्रांना हरित मतदान केंद्र केले आहे. या केंद्रांवर औषधी वनस्पती, सदाहरित वनस्पती, शोभेची झाडे-झुडपे, फुले व फळांच्या वनस्पती यांचे प्रदर्शन लावले आहे.
मतदानाची तारीख ः बुधवार, २० नोव्हेंबर
मतदानाची वेळ ः सकाळी ७ ते सायंकाळी ६
विधानसभानिहाय मतदान केंद्र व मतदार
मतदारसंघ / उमेदवार / मतदान केंद्र / पुरुष / महिला / तृतीयपंथी / एकूण
चिंचवड / २१ / ५६४ / ३,४८,४५० / ३,१५,११५ / ५७ / ६,६३,६२२
पिंपरी / १५ / ३९८ / २,०४,००५ / १,८७,५६८ / ३४ / ३,९१,६०७
भोसरी / ११ / ४९२ / ३,२८,२८० / २,८०,०४८ / ९७ / ६,०८,४२५
मावळ / ६ / ४०२ / १,९७,४३६ / १,८८,७२३ / १३ / ३,८६,३०१
एकूण / ४७ / १,४५४ / ८,८०,७३५ / ७,८२,७३१ / १८८ / १६,६३,६५४
मतदारांसाठी केंद्रावरील सोयी-सुविधा
- मतदान केंद्र इमारतीच्या आवारात केंद्राच्या रचनेचा नकाशा
- ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प
- पिण्याची पाण्याची व्यवस्था
- सावलीसाठी मंडप
- रांगेमध्ये उभे राहण्याऐवजी आवश्यकतेनुसार बसण्यासाठी बाक
- दिव्यांगांसाठी व्हील चेअर व मदतनीस
- दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांना केंद्रावर ने-आण करण्यासाठी रिक्षा
- मतदान केंद्रांवर मतदारांचे नाव शोधण्यासाठी सुविधा (बीएलओ)
- मतदारांच्या मदतीसाठी एनसीसी व एनएसएसचे स्वयंसेवक
- आठपेक्षा अधिक मतदान केंद्रांच्या ठिकाणी कलर कोडींगचा वापर
मतदान केंद्रांवर मोबाईल बंदी
मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक या व्यतिरिक्त उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि मतदारांना मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. मतदार केंद्रावर मोबाईल आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, छायाचित्रीकरण करण्यासही बंदी आहे. मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यासही मनाई आहे. मतदानाच्या दिवशी अनवधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या
१०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. तसेच सर्व उमेदवार आणि मतदारांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.
मतदान केल्यास शर्टाला मोफत इस्त्री
जुनी सांगवी ः मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपल्याला पटेल अशा उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल जाधव यांनी केले आहे. लॉन्ड्री संघटना संविधानाच्या अधीन राहून मतदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकांस वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन अनेक वर्षांपासून करत आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यात सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन लॉन्ड्री संघटनेने केले आहे. मतदान केल्याचे निशान अर्थात बोटावरची शाई दाखवून एक शर्ट मोफत इस्त्री करून घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. यामागील निव्वळ हेतू मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि मतदारांपर्यंत मतदानाचे महत्त्व कळाले पाहिजे, असेही जाधव यांनी सांगितले
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

