

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २८ : मातंग समाजाचे युवानेते म्हणून राज्यात काढलेल्या ‘बहुजन संवाद यात्रे’चा लाभ भाजपचे आमदार अमित गोरखे यांना होणार का? व त्यांची वर्णी राज्याच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळात लागणार का? याबाबत भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्याकाळात ‘संविधान बदलणार’ या ‘नॅरेटिव्ह’चा फटका भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात बसला होता. राज्याचे भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर योजना आखली. त्यानुसार विधान परिषदेवर आमदार म्हणून अमित गोरखे या मातंग समाजातील तरुण व उच्च शिक्षित नेतृत्वाची वर्णी लागली. फडणवीस यांनी दिलेल्या संधीचे सोने करत गोरखे यांनी राज्यभर ३० जिल्ह्यातील ७८ विधानसभा मतदारसंघातून ३१ हजार किलोमीटर बहुजन संवाद यात्रा काढली. त्यामुळे बहुतांश प्रमाणात अनुसूचित जाती या प्रवर्गात ‘संविधान बदला’चे नॅरेटिव्ह खोडण्यात आमदार गोरखे यांना यश आले, अशी भाजप वर्तुळात चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाचा शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकही आमदार निवडून आलेला नाही. भाजपमध्ये मातंग समाजाचे तीन आमदार आहेत. त्यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे, नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातून जितेश अंतापूरकर निवडून आले आहेत. तर; आमदार गोरखे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झालेली आहे.
आमदार सुनील कांबळे यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांना निवडणुकीपूर्वी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिलेले आहे. तर; आमदार अंतापूरकर हे नुकतेच दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आलेले आहेत. तर; गोरखे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यामुळे समाज घटकात पक्षाचा माणूस म्हणून त्यांचे नाव पोहचले आहे.
दरम्यान; मातंग समाजातील सकल मातंग समाज महाराष्ट्र संघटनेचे उषा नेटके, राज सोनावले, अर्जुन सकट, भानुदास नेटके, डॉ. साहेबराव सांगवीकर, महेंद्र तुपसुंदर, मातंग समाज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र अवघडे, उपाध्यक्ष तातोबा भिसे, सचिव संजय चव्हाण, खजिनदार गणेश लोखंडे, मराठवाडा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद सुतार, दीपक चखारे आदींच्या शिष्टमंडळासह राज्यातील समाजाच्या विविध शिष्टमंडळांनी पक्षाने नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार गोरखे यांची मंत्रिपदी वर्णी लागावी अशी शिफारस केली आहे. त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळात आमदार गोरखे यांची वर्णी लागते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फोटो ः 66620
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.