

पिंपरी, ता. ३ : अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर वाहनचालकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून समुपदेशन करण्याची पद्धत प्रभावी ठरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. सहा प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या पथकांकडून हे समुपदेशनाबरोबरच बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्याचेही काम करण्यात आले. त्यामुळे, यावर्षी तरी द्रूतगतीवरील वाहतूक तूर्तास शिस्तीत चालली असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये द्रूतगती मार्गावरील अपघातांची संख्या ४८ इतकी होती. यंदा ही संख्या ३८ एवढी नोंदविली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांच्या संख्येत दहाने घट झाली आहे. सहा आरटीओ कार्यालयांतील पथकांकडून हे समुपदेशन करण्याबरोबरच बेशिस्त वाहतुकीवर अंकुश ठेवण्याचे कामही केले जात होते. त्यामुळे, काही अंशी वाहनधारकांना शिस्त लावण्यात आल्याचे निरिक्षण ‘आरटीओ’ विभागाने नोंदविले आहे.
अपघातांची प्रमुख कारणे...
अतिवेगात वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, लेन कटिंग करणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन थांबविणे, विरूध्द दिशेने वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने मार्गावर येणे किंवा बाहेर पडणे, दुचाकीचा अवैध प्रवेश, वाहनांना रिव्हर्स दिशेने मागे घेणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आदींसह अनेक कारणांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याची स्थिती होती.
समुपदेशनाचा प्रभावी उपाय
राज्य शासनाने अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच समुपदेशनाचा मार्ग अवलंबला. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व इतर कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या मदतीने पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर कारवाईसह समुपदेशन केले जाऊ लागले. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसले.
मृतांच्या आकड्यातही घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटली आहे. २०२३ मध्ये या मार्गावर ४८ अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत ३८ अपघातांची नोंद झाली आहे. अपघातांची संख्या कमी होण्याबरोबरच मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. यावर्षी ४१ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मनुष्यबळाअभावी समुपदेशन बंद
गेल्या वर्षी ‘आरटीओ’ची पथके द्रूतगतीवर चोवीस तास कार्यरत होती. पिंपरी-चिंचवड, पुणे, पनवेल, वाशी, पेण, बारामती या सहा कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. पथकात एक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि चालक आदींचा समावेश होता. दोन समुपदेशन केंद्राची देखील उभारणी करण्यात आली होती. त्याचा सकरात्मक परिणाम देखील झाला. मात्र, पुरेशा मनुष्यबळाअभावी ही पथके बंद करण्यात आली आहेत.
जानेवारी ते सप्टेंबर महिन्यातील अपघातांची आकडेवारी
महिना - २०२३ - २०२४
१) जानेवारी - २ - २
२) फेब्रुवारी - ५ - ४
३) मार्च - ३ - ४
४) एप्रिल - ११ - ५
५) मे - ९ - ४
६) जून - ६ - ७
७) जुलै - ४ - ४
८) ऑगस्ट - ३ - ५
९) सप्टेंबर - ५ - ३
एकूण - ४८ - ३८
वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ‘आरटीओ’च्या पथकातील कर्मचारी दंडात्मक कारवाई करून शिस्त लावत होते. तसेच सहा कार्यालयांचे मिळून समुपदेशन पथक निर्माण केले होते. त्यांच्यामार्फत वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात होती. त्यामुळे, अपघातांच्या संख्येत घट झाल्याची स्थिती होती.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.