त्रिवेणीनगर चौकात वाहनचालकांना दिलासा

त्रिवेणीनगर चौकात वाहनचालकांना दिलासा
Published on

पिंपरी, ता. ३ : वाहतुकीत केलेला बदल आणि रस्ता रुंदीकरणामुळे सर्वाधिक रहदारीच्या त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी फुटली आहे. त्यामुळे, वाहन चालकांना दिलासा मिळत आहे.
निगडी-तळवडे मार्गावर एमआयडीसी, आयटी पार्क, शाळा- महाविद्यालये, देहू-आळंदी तीर्थक्षेत्रे यासह मोठा रहिवासी भाग आहे. त्याने मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, डंपर, कंटेनर, ट्रेलर अशा मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे, या मार्गाने प्रवास करताना वाहन चालकांना त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागायचे. वाहन चालक खूप वेळ कोंडीत अडकून पडायचे. अरुंद रस्ता तसेच रस्त्यातील बांधकामांमुळे रखडलेले स्पाईन रस्त्याचे काम यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.

प्रशस्त रस्त्याचे काम हाती
दरम्यान, पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळ गोदाम ते निगडीतील भक्ती- शक्ती चौक या दरम्यानच्या स्पाईन रस्त्याचे काम झाल्यानंतर या मार्गावरील त्रिवेणीनगर चौकातील अडथळा ठरणारी बांधकामे काही दिवसांपूर्वीच हटविण्यात आली. रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. यासह प्रशस्त रस्त्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

वाहतूक बदल फायदेशीर
वाहतूक विभागाकडून काही मार्गांत बदल करण्यात आले आहेत. या चौकात सहा रस्ते एकत्र येत असल्याने पूर्वी सर्व बाजूंची वाहने या चौकांत एकत्र यायची. त्यामुळे, वाहतूक कोंडीत भर पडायची. आता निगडीच्या दिशेने आल्यानंतर तळवडेकडे जाणारी वाहने त्रिवेणीनगर चौकातून वळण न घेता अंकुश चौकाच्या दिशेला जाऊन वळण घेत पुन्हा त्रिवेणीनगर चौकात येऊन तळवडेच्या दिशेने जात आहेत. तसेच तळवडेकडून येणारी वाहने डाव्या बाजूला वळण घेऊन थेट निगडीच्या दिशेने जात आहेत. तसेच इतर मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी बॅरिकेड्स उभारून व्यवस्थित नियोजन केले आहे. त्यामुळे, वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे.

त्रिवेणीनगर चौकात अनेक मार्ग एकत्र येत असल्याने वाहतूक कोंडी व्हायची. दरम्यान, येथील काही वाहतूक मार्गांत बदल केल्याने तसेच रस्त्याचे रुंदीकरणही झाल्याने येथील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी फरक पडेल.
- रूपाली बोबडे, पोलिस निरीक्षक, निगडी, वाहतूक विभाग

या मार्गावरून रोजच प्रवास करावा लागतो. त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडीत नेहमी अडकून पडावे लागायचे. मात्र, आता येथील या मार्गावरील वाहतुकीत काहीसा बदल केल्याने वाहतूक कोंडी फुटली आहे.
- प्रवीण पिंजण, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com