

पिंपरी, ता. ३ ः मुंबई-पुणे लोहमार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी आणि चिंचवड येथे उड्डाणपूल उभारले आहेत. त्यांचे आयुष्य संपलेले असल्याने दोन्ही पूल पाडावेत, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेला गेल्या आठवड्यात पाठवले आहे. त्याची दखल घेऊन चिंचवड स्टेशन येथे नवीन पूल उभारण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी मंजुरी दिली. पिंपरीतील पुलाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई-पुणे महामार्गाला समांतर लोहमार्ग आहे. तो शहराच्या मध्यातून गेला आहे. त्यामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. त्यांना जोडण्यासाठी आणि शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने पिंपरी येथे इंदिरा गांधी यांच्या नावाने उड्डाणपूल उभारला आहे. त्यामुळे महामार्गासह भोसरी एमआयडीसी आणि पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, चिंचवड लिंक रस्ता परिसर जोडले गेले आहेत. हा उड्डाणपूल शहरातील सर्वात जुना आहे. त्याचे आयुष्य संपले आहे. तो धोकादायक झाला असून, वाहतुकीस बंद करावा व पाडून टाकावा, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले होते. त्यानंतर महापालिकेने पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले आणि त्याच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. आता चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्रही रेल्वेने महापालिकेस पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. या पुलाच्या एका भागातून अवजड वाहतूक गेल्या वर्षापासून बंद आहे.
स्थायी समितीची मंजुरी
चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गादरम्यान असलेल्या लोहमार्गावर नवीन पूल उभारण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी स्थायी व सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. चिंचवड स्टेशन मुंबई-पुणे महामार्ग ते चिंचवडगाव मार्गावर लोहमार्गावर दोन समांतर पूल अस्तित्वात आहेत. चिंचवड स्टेशनकडून गावाकडे जाणाऱ्या पुलाचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. त्यांच्या सूचनेनुसार जुन्या पुलावर अवजड वाहनास प्रवेश बंदी केली आहे. पीएमपी बससुद्धा खंडोबा माळ आकुर्डी मार्गे वळविण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याच्या विषयास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.