जनजागृती, व्हीलचेअर नृत्य आणि सन्मान जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात

जनजागृती, व्हीलचेअर नृत्य आणि सन्मान
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात
Published on

पिंपरी, ता. ३ ः दिव्यांग बांधवांची जनजागृती फेरी, व्हीलचेअर नृत्य, गुणवंत दिव्यांगांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमांचा आनंद शहरातील दिव्यांगांनी घेतला. निमित्त होते, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित विविध कार्यक्रमाचे.
आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहायक आयुक्त तानाजी नरळे, दिव्यांग कक्षाचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी सुचेता पानसरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी, परशुराम बसवा, जनार्दन कोळसे, शंकर सोळसे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
सामाजिक दायित्व निधीत भरीव मदत करणारे बी. एम. सी. सॉफ्टवेअर कंपनीचे सीएसआर हेड दिवांजी चावला, भाग्यलक्ष्मी, सोनाली वाघ, ब्रिजस्टोन इंडिया कंपनीचे सीएसआर हेड राणू कुलश्रेष्ठ, सैफुल हक, निकीता गुल्हाने यांचा सन्मान केला.
आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘दिव्यांग बांधवांना स्वत:ची हक्काची जागा महापालिकेचे दिव्यांग भवन वाटावे, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. दिव्यांग भवनामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करून अधिक दर्जेदार सुविधा पुरविण्यावर भर देत आहे.’’ अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘‘महापालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हा इतर महापालिकांसाठी एक पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. विविध महापालिकांचे अधिकारी भवनाला भेटी देत आहेत. शासनाचा ‘दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम व्यापक स्वरूपात राबविणारी महापालिका महाराष्ट्रात अग्रेसर ठरली आहे. प्रत्येक दिव्यांगाला रोजगार उपलब्ध करून देणे, स्वत:च्या अस्तित्वासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. दिव्यांग भवनाद्वारे अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा, मदत आणि सहकार्य केले जात आहे.’’
चिंचवड येथील मूक-बधीर विद्यालयातील मुलांनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत सादर केले. भोसरी येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. भाग्यश्री मोरे, संगीता जोशी यांनी व्हीलचेअरवर नृत्य केले. दिव्यांग बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले. विशाल शेडगे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले...
- सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे अपंगत्व ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करण्याची आवश्यकता आहे
- सुरवातीलाच निदान होऊन योग्य उपचाराने कमी वेळेत दिव्यांगत्त्वावर मात करण्यास मदत होऊ शकते
- दिव्यांगांना एका क्लिकवर सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिका विशेष ॲपची निर्मिती करणार
- प्रत्येक दिव्यांगासाठी स्मार्टकार्ड तयार करून विविध प्रकारच्या थेरपी, उपचार आणि वैयक्तिक माहिती संग्रहित करणार
- सर्वांना सहजपणे सुविधांचा लाभ घेता येण्यासाठी शहरातील दिव्यांग बांधवांचे नव्याने सर्वेक्षण करणार

सन्मानार्थी दिव्यांग बांधव
दिव्यांग भवन प्रकल्पाच्या उभारणीमध्ये विशेष कामगिरी केलेले अभिजित मुरूगकर, कविता मुरूगकर; गेली १० वर्षे दिव्यांग सेवेत कार्यरत राजेंद्र वाघचौरे; २४ व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेमध्ये चार सुवर्ण, एक कांस्य पदक आणि महाराष्ट्र शासन सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी वर्ग २ पदासाठी निवड झालेल्या वैष्णवी जगताप; १६ व्या राज्यस्तरीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेत १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण आणि ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक मिळविलेले संकल्प बोत्रे, गेल्या २५ वर्षांपासून पायी आषाढीवारीला जाणारे कीर्तनकार विजय कुदळे; आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करत भारताला चार पदक मिळवून देणारे मिलिंद सावंत यांचा सन्मान केला.

संस्था व त्यांचे प्रतिनिधी
नंदनवदन कुष्ठपिडीत बहुद्देशीय संस्था, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, ब्रह्मदत्त विद्यालयातील १५ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे दिव्यांग विद्यार्थी, जिल्हास्तरीय संगीत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे दिव्यांग विद्यार्थी, पताशीबाई रतनचंदमानव ट्रस्ट या अंधशाळेतील संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी, १५ व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत आणि जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या आंतरशालेय नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अभिराज फाऊंडेशनचे विद्यार्थी, सुरत व गुजरात येथे राष्ट्रीय साद परिषद येथील चित्र व हस्तकलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी, घरकुल अपंग सहाय्य संस्था, पिंपरी-चिंचवड कर्णबधिर असोसिएशन, मूक-बधिर सोयायटीमधील अंध नागरिकांच्या समस्या सोडविणारे नागरिक यांचाही सन्मान केला.
---
फोटोः 68082, 68083, 68084
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com