थकबाकीदारांवर जप्तीची ‘कुऱ्हाड’

थकबाकीदारांवर जप्तीची ‘कुऱ्हाड’

Published on

पिंपरी, ता. ७ ः वेळोवेळी नोटीस व स्मरणपत्र देऊन मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे नियोजन महापालिका कर आकारणी व करसंकलन विभागाने केले आहे. त्यासंदर्भात पाच हजार ५९ मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस बजावल्या असून, कारवाईचे अधिकारी विभागीय करसंकलन कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापालिकेकडे नोंद असलेल्या सहा लाख ३३ हजार २९४ मालमत्ता शहरात आहेत. त्यात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मोकळ्या जमिनी, मिश्र वापर आदींचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत चार लाख दोन हजार मालमत्ताधारकांनी ५६५ कोटी रुपयांचा मालमत्ताकर महापालिकेकडे जमा केला आहे. अद्याप दोन लाख २२ हजार ६५६ मालमत्तांचा कर थकीत आहे. त्यातील पाच हजार ५९ मालमत्तांचे जप्ती पत्र काढले आहेत. जप्तीच्या कारवाईसाठी प्रशासन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

जप्तीची कारवाई का?
मालमत्ताकराच्या बिलांसोबतच मालमत्ताधारकांना जप्ती पूर्व नोटीस बजाविली आहे. तरीही विहित कालावधीत थकीत करभरणा न केल्याने मालमत्तेच्या थकीत रकमेच्या किमतीची जंगम मालमत्ता अटकावून ठेवावी किंवा थकीत मालमत्तेच्या जागेवरील कोणतीही स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश व अधिकार प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

थकबाकी २३४ कोटी
महापालिका करसंकलन विभागाकडून १५ विभागीय कार्यालयाअंतर्गत पाच हजार ५९ मालमत्ताधारकांकडे २३४ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी आहे. २८ कोटी १९ लाख रुपयांची चालू मागणी आहे. एकूण येणे रक्कम २६२ कोटी ५० लाख रुपये आहे. मोशी विभागीय कर संकलन कार्यालयाने जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. इतर कार्यालयांनीही कारवाई सरू केली आहे.

नळजोड तोडणार
मालमत्ता जप्ती सोबतच थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळजोड खंडित करण्याचा आदेशही महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने विभागीय कार्यालयांना दिला आहे. थकीत मालमत्ताकरावर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क वाढत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

जप्तीपत्र तयार मालमत्तांचा तपशील
कार्यालय / जप्तीपत्र / थकबाकी (कोटी रुपयांत) / चालू कर / एकूण रक्कम
निगडी प्राधिकरण / १९ / ३१.७५ / १.०३ / ३२.७८
आकुर्डी / ५४६ / १७.८९ / ४.०५ / २१.९४
चिंचवड / १७७ / १९.९१ / १.७३ / २१.६४
थेरगाव / ३८७ / २९.८२ / २.९७ / ३२.७९
सांगवी / ११३७ / ३०.२४ / ३.४६ / ३३.७०
मनपा भवन / ४५३ / १३.८४ / २.१८ / १६.०२
फ़ुगेवाडी दापोडी / ११० / २.३४ / ०.४४ / २.७८
भोसरी / ५० / ७.१९ / ०.७७ / ७.९६
मोशी / २८३ / १०.०३ / १.१८ / ११.२१
चिखली / ४९९ / २९.९० / ३.८० / ३३.७०
तळवडे / ४५२ / १८.८८ / २.७२ / २१.६०
किवळे / ४४० / ७.१३ / १.१६ / ८.२९
वाकड / ५०६ / १५.३९ / २.७० / १८.०९
एकूण / ५०५९ / २३४.३१ / २८.१९ / २६२.५०

अशा आहेत मालमत्ता
प्रकार / संख्या
निवासी / ५,४१,१६८
बिगर निवासी / ५७,७३३
औद्योगिक / ४,५६३
मोकळ्या जमिनी / ११,३२३
मिश्र / १६,००१

इतर / २,५०६

थकबाकीदारांच्या पाच हजार ५९ मालमत्ता जप्तीचे आदेश विभागीय कार्यालयांना दिले आहेत. भाडे तत्त्वावर दिलेल्या, मिश्र व व्यावसायिक मालमत्ता लक्ष केल्या आहेत. त्यांच्या मालकांनी लवकरात लवकर थकीत कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com