मेट्रो इको पार्कमधील दुर्मिळ झाडे धोक्यात
पिंपरी, ता. ११ ः शहरात उभारण्यात आलेल्या मेट्रो इको पार्कमधील झाडे देखभाल दुरुस्तीअभावी सुकल्याने या पार्कचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्कच्या परिसरात निवडणूक आयोगाचे गोदाम उभारण्याचे काम सुरू असल्याने या झाडांच्या देखभालीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिक व वृक्षप्रेमी करीत आहेत.
मेट्रोने उभारलेल्या पार्ककडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात मेट्रो मार्गिका उभारताना तोडलेल्या झाडांची भरपाई करण्यासाठी पुणे मेट्रोने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरांच्या भूखंडावर सुमारे एक हजार झाडे लावली. एवढेच नाही तर येथे जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅकही बांधण्यात आला. हा भूखंड विकसित करून मेट्रोने पीएमआरडीएकडे सुपूर्त केला. मात्र त्यानंतर या भूखंडावर निवडणूक आयोगाचे गोदाम उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ताब्यात घेतला. या पार्कमध्ये बांधकाम झाल्यास झाडांचे व येथील जीवसृष्टीची हानी होईल, अशी भूमिका घेत येथील पर्यावरण प्रेमी व रहिवाशांनी या बांधकामाला विरोध केला. मात्र, तरीही बांधकाम सुरू राहिले.
गेल्या वर्षी १४० झाडे मृत
निवडणूक आयोगाच्या गोदामाच्या उभारणीसाठी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली. मात्र, या विभागाच्या निष्काळजीपणामुळे याआधीही येथील झाडे मृत पावल्याची घटना घडली आहे. बांधकामादरम्यान झाडांची योग्य ती काळजी न घेतल्याने मेट्रो इको पार्कमधील १४० झाडे जळाल्याचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या पंचनाम्यात उघड झाले होते. या वर्षीही पावसाळ्यानंतर पाण्याअभावी झाडांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची भीती वृक्षप्रेमी व्यक्त करत आहेत.
‘मेट्रो इको पार्कमधील झाडांची काळजी घ्यावी त्यांची योग्य देखभाल करावी असा आदेश खुद्द उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. गेल्या वर्षी १४० झाले मृत पावली. या वर्षी काही काळ वीज नसल्याने झाडांना पाणी मिळू शकले नाही. आता तर या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. आधी पाण्याअभावी सुकलेल्या झाडांचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले आहे. हे पार्क गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने आम्हीही आत जाऊन पाणी देऊ शकत नाही.’
- विकास बडोलिया, मेट्रो इको पार्क बचाव समिती, रावेत
‘‘काही दिवसांपूर्वी पार्कमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता, तो पूर्ववत झाला आहे. वाढलेले गवत काढण्यासाठी मजूर नेमण्यात आले असून पुढील काहीच दिवसांमध्ये गवत काढण्याचे काम पूर्ण होईल. सध्या पार्कमध्ये नळजोड नाही. परंतु, झाडांना बोअरवेल व टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे. सध्या थंडी असल्याने काही प्रमाणात पानगळ होत आहे. झाडे सुकणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे.’
- अनिल मलशेट्टी, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

