गुन्हे वृत्त
बनावट दस्तऐवज
बनविणाऱ्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी ः ड्रायव्हर्स, सिक्युरिटी गार्ड, हाऊस कीपिंग स्टाफ व इतरांना बनावट पत्त्याद्वारे बनावट पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) मिळवून दिल्याबद्दल तिघांसह इतरांवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २०२१ ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान टाटा कम्युनिकेशन (विदेशी संचारलिगम लि.) दिघी येथील कंपनीत ही घटना घडली. दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस शिपाई पुंडलिक पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून संदीप बनसोडे, (रा. लोहगाव), सुनील रोकडे (रा. पिंपळे गुरव), अनोळखी व्यक्ती आणि त्यांना मदत करणारे तसेच बनावट पीसीसी करणारे इतर अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------
सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी ः वाहनावर कारवाई करू नये म्हणून दुचाकी चालकाने थेट वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर साई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान खराळवाडी येथे घडली. तुषार सुंदरबापू क्षीरसागर (वय ३०, रा. देहू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
-------------------
जाब विचारला म्हणून
युवकासह आईला मारहाण
पिंपरी : कामावर निघालेल्याला शिवीगाळ करून काठी हातात घेऊन मारण्याची धमकी देणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाला त्याच्या कुटुंबासह मारहाण करण्याची घटना बावधन येथे घडली. या प्रकरणी रोहित अनिल राजपूत (वय ३०, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (ता.१०) सकाळी पावणे सात ते साडे सातच्या सुमारास दुर्गामाता मंदिर समोर बावधन पुणे येथे घडली.
रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या आईच्या डाव्या पायावर मारुन तिला जखमी केल्याप्रकरणी या प्रकरणी राजेंद्र राजपूत, उनेश राजपूत, अरविंद राजपूत आदींसह तीन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------
मिक्सर ट्रकच्या
धडकेत दोघांचा मृत्यू
पिंपरी ः वाकड-हिंजवडी मार्गावर मिक्सर ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. पांडुरंग लक्ष्मण विटकर (वय २१), सम्राट विनोद महाले (वय १९, रा. माण, ता. मुळशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अजिंक्य शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजबहादूर जगन्नाथ साकेत (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------
कंटेनरच्या धडकेत
महिलेचा मृत्यू
पिंपरी ः कंटेनरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. १०) सकाळी साडे नऊ वाजणाच्या सुमारास आंबेठाण-चाकण रोडवर आंबेठाण येथे घडला. पूजा विनोद ढमाले (वय ४४, रा. कडूस, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश बाळासाहेब पानमंद (वय ३१, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंडलिक बाळू टोणे (वय ४४, रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------
गांजा विक्रीप्रकरणी
तरुणास अटक
पिंपरी ः गांजा विक्रीप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १०) दुपारी पत्राशेड अजंठानगर येथे करण्यात आली. प्रकाश रवी पांडे (वय २३, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार मयूर वाडकर यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

