

पुणे, ता.१३ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकाविले. उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक-माध्यमिक (सेमी इंग्लिश) आणि उच्च माध्यमिक स्कूल संघाने रौप्यपदकावर तर एरंडवणेच्या अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम संघाला ब्राँझ पदकावर नाव कोरले.
पिसोळी येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर हे सामने झाले. काही अपरिहार्य कारणामुळे अंतिम सामन्यात डॉ.अस्मिता विद्यालयाचा संघ अनुपस्थित राहिला. त्यामुळे, मिलेनियम नॅशनल स्कूलच्या संघाला विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अभिनव विद्यालय संघाने विबग्योर, एनआयबीएम संघावर आठ विकेट राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना विबग्योर संघाने निर्धारित १५ षटकांत १२९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यामध्ये अनुज पारख याने दमदार ४० धावा केल्या. वेदांत परांडे (नाबाद २२) शिवांश कपूर (३४) यांनीही संघाच्या धावसंख्येस आकार देण्याचा प्रयत्न केला. तथापि, अभिनव विद्यालयाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.
अभिनव विद्यालयाने विजयासाठी १३० धावा पूर्ण करण्याचे लक्ष्य १३.४ षटकांत व केवळ दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले. त्याचे श्रेय शौनक राजे याच्या आक्रमक अर्धशतकास द्यावे लागेल. त्याने २९ चेंडूंमध्ये दोन षटकार व चार चौकारांसह ५० धावा केल्या. या स्पर्धेत सातत्याने दमदार फलंदाजी करणारे वीर कारखानीस (२२), ईशान गुप्ते (२१) व आलाप पंगू (नाबाद २६) यांनीही शैलीदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अभिनव स्कूल संघाने १० षटकांत ४ बाद ८१ धावा केल्या. त्यामध्ये ईशान गुप्ते यांच्या नाबाद ४९ धावांचा मोठा वाटा होता. मिलेनियम नॅशनल संघाने हे आव्हान केवळ एक विकेटच्या मोबदल्यात आणि नऊ षटकांत पार केले.
डॉ.अस्मिता विद्यालय संघाने विबग्योर संघास १० षटकांत ६ बाद ८० धावांवर रोखले. अस्मिता विद्यालयाकडून प्रसाद अंबले व श्रेयस शिवरकर यांनी प्रभावी गोलंदाजी केली. विबग्योर संघाच्या शिवांश कपूर याने सर्वाधिक ४० धावा केल्या. अस्मिता विद्यालय संघाने विजयासाठी असलेले ८१ धावांचे आव्हान केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि ८.४ षटकांत पार केले.
संक्षिप्त धावफलक
ब्राँझ पदक लढत ः विबग्योर, एनआयबीएम : १५ षटकांत ४ बाद १२९ (अनुज पारख ४०, वेदांत परांडे नाबाद २२, शिवांश कपूर ३४, शर्विल पाटील नाबाद ११, अवांतर ८, असीम देवगावकर १/२८, आलाप पंगु १/१४, वीर कारखानीस १/१९) ८ विकेट राखून पराभूत विरुद्ध अभिनव विद्यालय एरंडवणे : १३.४ षटकांत २ बाद १३० (शौनक राजे ५०, वीर कारखानीस २२, ईशान गुप्ते नाबाद २१, आलाप पंगू नाबाद २६, अवांतर ११, अर्णव अग्रवाल १/३३, आरव वर्मा १/३०) सामनावीर : शौनक राजे.
उपांत्य फेरी :
अभिनव स्कूल : १० षटकांत ४ बाद ८१ (ईशान गुप्ते नाबाद ४९, वीर कारखानीस १२, शर्विल गोसावी १२, अवांतर ८, हर्षवर्धन मानकर १/१४, शुभम पिंपळकर १/१५) ८ विकेट राखून पराभूत विरुद्ध मिलेनियम नॅशनल : ९ षटकांत २ बाद ८३ (चैतन्य गायधनी नाबाद ३०, वरद चित्रे ३२, शुभम पिंपळकर नाबाद १६, अवांतर ४, आलाप पंगू १/१५, शर्विल गोसावी १/१४) सामनावीर : वरद चित्रे
विबग्योर हायस्कूल : १० षटकांत ६ बाद ८० (आरव अगरवाल १६, शिवांश कपूर ४०, अवांतर ११, प्रतीक कडलक १/९, प्रसाद अंबले ३/११, श्रेयस शिवरकर २/१५) ७ विकेट राखून पराभूत विरुद्ध डॉ. अस्मिता विद्यालय, उरळी कांचन : ८.४ षटकांत ३ बाद ८४ (देवांश मेमाणे नाबाद २८, प्रतिक कडलक २८, अवांतर १५, आरव अग्रवाल २/१०, वेदांत परांडे १/१३) सामनावीर : प्रसाद अंबले
PNE24U71148, PNE24U71149, PNE24U71150, PNE24U71151, PNE24U71152
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.