महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील ‘अन्नपूर्णा’

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील ‘अन्नपूर्णा’
Published on

पिंपरी, ता.२२ ः राज्यातील विविध प्रदेशांना स्वतःची एक खाद्य संस्कृती आहे. हीच खाद्य संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी काही महिलांनी एकत्र येऊन अन्नपूर्णा फूड्स नावाने घरगुती पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या परदेशी पदार्थ किंवा फास्ट फूडच्या जमान्यात महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती पुढील पिढीपर्यंत नेण्याचे ध्येय महिलांनी उराशी बाळगले आहे.
मधुरा देशपांडे, अंजली क्षीरसागर, चारुता देशपांडे या एकाच कुटुंबातील महिला. जेव्हा,जेव्हा घरात काही कार्यक्रम असतो किंवा बाहेर जेवायला जायचा विचार येतो. तेव्हा, पंजाबी, कॉन्टिनेंटल या पदार्थांचे पर्याय जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या तुलनेने महाराष्ट्रीय पदार्थ कुठेतरी लुप्त होत चालल्याची जाणीव झाल्याने त्यांनी फक्त महाराष्ट्रीय पदार्थांचा केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. या तिघी मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील मोदक आमटी, धपाटे, पिठल्याची वडी या पदार्थांपासून त्यांनी सुरुवात केली. या पदार्थांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने हळूहळू महाराष्ट्रातील इतर पारंपरिक पदार्थही बनविण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि अवघ्या काहीच दिवसांत ‘अन्नपूर्णा फूडस्’ च्या पदार्थांना लोकप्रियता मिळाली. आपले महाराष्ट्रीय पदार्थ लोकप्रिय व्हावेत त्यातील पोषणमूल्य इतरांना कळावीत, हा यामागचा उद्देश्‍य असल्याचे या महिला सांगतात.

प्रदर्शनामधून पदार्थांना पसंती
मधुरा, अंजली व चारुता या तिघीही आधीपासूनच नोकरी-व्यवसायामध्ये आहेत. मात्र, महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती टिकावी असे त्यांना फार प्रकर्षाने जाणवले व त्यांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा शनिवार, रविवार ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. नंतर भिशी, लहान घरगुती कार्यक्रम यांच्या ऑर्डर त्यांनी घेतल्या. आपल्या व्यवसायाचे ब्रॅडिंग करण्यासाठी त्यांनी प्रदर्शनातही सहभाग घेतला. त्यावेळी अनेक ग्राहकांनी आपल्या महाराष्ट्रीय पदार्थांना पसंती दिल्याचे त्या सांगतात.

सध्या सर्वच वयोगटांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी उद्भवत आहेत. त्यातील सर्वाधिक आजार हे जंक फूडचे सेवन किंवा योग्य आहार न घेतल्याने होत आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रीय पदार्थ सर्वाधिक पोषण मूल्य असलेले आहेत. त्या त्या ऋतूमध्ये ठराविक पदार्थ सेवन करण्याची आपली परंपरा जीवनशैली निरोगी ठेवते. हीच परंपरा पुढे न्यावी आणि महाराष्ट्रीय खाद्य संस्कृती जपावी, यासाठी आम्ही हा व्यवसाय सुरू केला.
- चारुता देशपांडे, महिला व्यावसायिक, अन्नपूर्णा फूडस्

मला आणि आमच्या कुटुंबीयांना पहिल्यापासूनच नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड आहे. त्यात आम्ही अनेकदा पारंपरिक पदार्थ बनवत असतो. हेच पदार्थ इतरांपर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही हा व्यवसाय सुरू केला. सध्या आम्ही विविध प्रदर्शनांतून सहभाग घेत आहोत. एकदा आमच्याकडे येणारे खवय्ये पुन्हा येऊन या पारंपरिक पदार्थांची मागणी करत आहेत.
- मधुरा देशपांडे, महिला व्यावसायिक, अन्नपूर्णा फूडस्

गेल्या अनेक वर्षांपासून काहीतरी वेगळ करावे याचा आम्ही विचार करत होतो. घरातल्या काही कार्यक्रमांनाही आम्ही पारंपरिक पदार्थच करणे पसंत करतो. त्यामुळे, घरच्यांचाही याला पाठिंबा होता. चारुताने यामध्ये पुढाकार घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात आम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे, या व्यवसायाचा विस्तार करण्याचा आमचा विचार आहे.
- अंजली क्षीरसागर, महिला व्यावसायिक, अन्नपूर्णा फूडस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com