ऑगस्टमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 
महापालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे यांची माहिती; पिंपरीत प्रशिक्षकांची बैठक

ऑगस्टमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महापालिका अतिरिक्त आयुक्त खोराटे यांची माहिती; पिंपरीत प्रशिक्षकांची बैठक

पिंपरी, ता. ५ ः माणसाच्या भौतिक प्रगतीसोबत कला, क्रीडा या गुणांचा देखील विकास झाला पाहिजे. लहानपणापासूनच शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कला आणि क्रीडा विकासासाठी भरीव काम करत आहे. या उद्देशानेच जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ऑगस्टमध्ये केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांबाबत क्रीडा अधिकारी, पर्यवेक्षक आणि शिक्षकांची बैठक पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. त्यावेळी खोराटे बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहायक आयुक्त पंकज पाटील, प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, ज्येष्ठ क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, बलराम शिंदे, आहारतज्ज्ञ सोनिया लुथ्रा यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी, महापालिका आणि खासगी विद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक, शालेय प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील विविध खासगी शाळांमधील क्रीडा पर्यवेक्षक आणि शिक्षकांनीही सहकार्य करावे. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना आणि संघांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही खोराटे यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी स्पर्धेच्या नियोजनातील अडचणी, आवश्यक सोयीसुविधा, खेळाडूंचा सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया, खेळाडूंचे प्रशिक्षण, स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणारे फायदे, बक्षिसाची रक्कम, शिष्यवृत्ती, नोकरीमध्ये आरक्षण, शासनाकडून विविध खेळांसाठी देण्यात येणारे मानधन आणि सोयीसुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली. आहारतज्ज्ञ सोनिया लुथ्रा यांनी खेळाडूंच्या दैनंदिन आहाराबद्दल माहिती दिली.

शिक्षक, प्रशिक्षकांना आवाहन
सहायक आयुक्त पंकज पाटील म्हणाले, ‘‘शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ऑगस्टमध्ये करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील क्रीडाविषयक आवड जोपासणे हे या स्पर्धेमागचे उद्दिष्ट आहे. अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक विकास होणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना आवड असलेल्या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे.’’

‘‘महापालिकेने पूर्वीपासूनच खेळांच्या विविध प्रकारांसाठी योगदान देऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये कबड्डीचे मैदान, टेनिस आणि बॅडमिंटन हॉल्स, जलतरण तलाव, हॉकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, आवश्यक खेळाचे साहित्य आदी सुविधा आहेत. खासगी शाळांनीही शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com