अल्पवयीनांना वाहन चालविण्यास देणे पडतेय महागात

अल्पवयीनांना वाहन चालविण्यास देणे पडतेय महागात

Published on

पिंपरी, ता. ६ : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्याप्रकरणीही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. मागील सहा महिन्यात १ हजार ४४५ जणांवर कारवाई केली असून, जून मध्ये तब्बल ४०८ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव मोटारीने धडक दिल्याने दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे अल्पवयीन वाहन चालकांचा मुद्दा उपस्थित झाला. वाहन परवाना नसताना, वाहतूक नियमांचे ज्ञान नसताना पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी सोपवितात. ही अल्पवयीन मुले वाहतूक नियम पायदळी तुडवून सुसाट सुटतात. यामध्ये अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. समोरच्या व्यक्तीला इजा पोहोचण्यासह मुलांनाही दुखापत होते. काही घटनांमध्ये तर मृत्यूदेखील झाले आहेत. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे मुलांसह इतरांच्याही जिवावर बेतत आहे. तरीही पालक लाडापोटी वाहन चालविण्यास देत असल्याचे समोर येते.

त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवर कारवाई केली जात आहे. या वर्षी एप्रिल व जून महिन्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
------------------------
‘‘पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.’’
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

या वर्षातील कारवाई
महिना कारवाई
जानेवारी ७२
फेब्रुवारी ६७
मार्च ६६
एप्रिल ७१४
मे ११८
जून ४०८
----------------------------------------
एकूण १ हजार ४४५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.