अग्निसुरक्षा यंत्रणा उभारा; फायर ऑडिट करा

अग्निसुरक्षा यंत्रणा उभारा; फायर ऑडिट करा

Published on

पिंपरी, ता. ७ ः आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा उभारावी. त्याबाबत सक्रिय उपाययोजना करून फायर ऑडिट करून घ्यावे. त्याबाबतचा अहवाल द्यावा, अशा सूचना महापालिका वैद्यकीय विभागाने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. तसेच, अग्निशमन विभागानेही खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार रुग्णालयांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत तपासणी करून अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या रुग्णालयांना पुन्हा नोटीस देऊन कार्यवाही केली जाणार आहे. अशा रुग्णालयांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही, अशी भूमिका अग्निशमन विभागाने घेतली आहे.
राज्यात व देशात रुग्णालयांत लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने खासगी रुग्णालये व दवाखान्यांच्या अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिका वैद्यकीय विभागाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालये, दवाखाने व नर्सिंग होम यांना आगीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना दिली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आठही रुग्णालयांचे फायर ऑडिट केले आहे. त्यात स्थापत्यसह आढळलेल्या विविध त्रुटी दूर केल्या जात आहेत. रुग्णालयांच्या जुन्या इमारतींची स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे सुचविली आहेत.

खासगी ६२३ रुग्णालयांना नोटीस
महापालिका अग्निशमन दलाने शहरातील ६२३ खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांना नोटीस बजावली आहे. आग प्रतिबंधक उपाययोजनांचा तपशील मागितला आहे. त्यानंतर अग्निसुरक्षेबाबत पाहणी केली जाणार आहे. यामध्ये अग्निशमन उपकरणांच्या तारखा, पाण्याचा दाब पातळी आणि अलार्म सिस्टमची कार्यक्षमता तपासली जाईल. अतिदक्षता सारख्या संवेदनशील विभागांवर विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच, आपत्कालीनप्रसंगी बचाव करण्याचे प्रात्यक्षिकही संबंधित कर्मचाऱ्यांना दाखवले आहे.

रुग्णालयांना सूचना
- फायर ऑडिट करावे, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, आपत्कालीन मार्ग, लिफ्ट यांची देखभाल दुरुस्ती करावी
- वीजवाहिन्या, वातानुकूलित यंत्रणा, वीज उपकरणे यांचे अग्निसुरक्षा मूल्यांकन करावे
- शस्त्रक्रियागृह, आयसीयू, डायलिसीस आदी वीज सामग्रीचा वापर होणाऱ्या कक्षांचे विद्युत ऑडिट करावे
- विविध रसायने, वायू, सिलिंडर, उष्णता पसरवणारी शस्रक्रिया उपकरणे, अशा ज्वलनशील पदार्थांची साठवण योग्य पद्धतीने करावी
- ऑक्सिजन वाहिन्या व टाक्यांचा परिसर धूम्रपान प्रतिबंधित करून तसे सूचना फलक लावावेत
- नियमितपणे अग्निसुरक्षा मूल्यांकन करून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घ्यावे
- आग लागल्यास रुग्ण, कर्मचारी व नागरिकांना बाहेर काढणे व अग्निप्रतिबंधक उपकरणे हाताळण्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे
- अग्निशमन विभागाकडून अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्राचे वार्षिक नूतनीकरण करून घ्यावे

आग लागण्याची कारणे
- शॉर्ट सर्किट
- ओव्हरहिटिंग
- ओव्हरलोडिंग
- निकृष्ट वीज उपकरणे
- अयोग्य वायरिंग
- योग्य अर्थिंग न पुरणे
- वातानुकूलित यंत्रणा

‘‘सुरक्षेच्या दृष्टीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात, ऑक्सिजन सिलिंडर असतात, औषधे असतात. फर्निचरसह इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणेही असतात. त्यामुळे फायर ऑडिट गरजेचे
आहे.’’
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकमान्य रुग्णालय

‘‘आगीसारख्या घटना टाळण्यासाठी महापालिकेकडे नोंद असलेले आणि महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. त्या सूचनांचे पालन करून केलेल्या उपाययोजनांचा अहवाल त्यांच्याकडे मागितला आहे.’’
- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

‘‘शहरातील खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांना अग्निसुरक्षेबाबत नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्याकडील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे. बहुतांश रुग्णालयांकडे अग्निसुरक्षा यंत्रणा आहे. ती नसलेल्या रुग्णालयांना नोटीस देणार आहे.’’
- मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, महापालिका
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.