बोगस मोटार ड्रायव्हिंग स्कूल, एजंटवर कारवाई करणार

बोगस मोटार ड्रायव्हिंग स्कूल, एजंटवर कारवाई करणार

Published on

पिंपरी, ता. ७ : ‘‘बोगस मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि एजंटांवर कारवाई करणार असून कार्यालयातील शिस्त राखली जाईल,’’ अशी ग्वाही नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली. याबरोबरच वाहन परवाने व इतर कामे अधिकाधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर झाले आहे. त्यानंतर, पहिले प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संदेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी या ठिकाणी अपेक्षित बदल करणार असल्याचे नमूद केले.
चव्हाण म्हणाले, ‘‘आरटीओमध्ये शिस्‍त आणण्यासाठी प्रयत्‍न केला जाणार आहे. तसेच नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस एजंटांवर कारवाई करण्यात येईल. परिवहन कार्यालय अंतर्गत भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे. हा बदल येत्या काही काळातच होईल.’’
मुंबई येथील परिवहन विभागातील संगणकीकरणाचा देखील चव्हाण यांच्याकडे पदभार आहे. नागरिकांना आरटीओ संबंधित भेडसावणाऱ्या समस्या आणि कार्यालयाची शिस्त याबाबत त्यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.