

पिंपरी, ता. ३० ः माणूस श्रीमंत असो की गरीब, मध्यमवर्गीय असो की नोकरदार. प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते. मात्र, सर्वसाधारण कामगार, सामान्य माणूस यांना आर्थिक अडचणींमुळे घर घेणे शक्य होत नाही. अशा आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून महापालिकेने गृहप्रकल्प उभारले आहेत. काहींचे काम सुरू असून, काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचेही घराचे स्वप्न साकार होऊ लागले असून, सुमारे पाच हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, डुडुळगाव प्रकल्पातील घरांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यास महापालिकेने मुदतवाढ दिली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. राज्य सरकारनेही त्यात थोडे अर्थसाहाय्य देऊ केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली. शहरातील पिंपरी, आकुर्डी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशीतील बोऱ्हाडेवाडी आणि रावेत अशा सहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना आखली आहे. त्यातील रावेत प्रकल्प भूसंपादनाबाबत न्यायप्रविष्ट आहे. चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील घरांची सोडत काढून, वाटप झाले आहे. पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सदनिका वाटपाच्या टप्प्यावर आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी सोमवारपर्यंत (ता. ३०) अर्ज प्रक्रिया सुरू होती. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लाभार्थींना केवळ १४ लाख १४ हजार १७३ रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. केंद्र सरकार प्रतिसदनिका दीड लाख आणि राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे.
अशा आहेत सदनिका
प्रकल्प / सदनिका
चऱ्होली / १४४२
बोऱ्हाडेवाडी / १२८८
डुडुळगाव / ११९०
आकुर्डी / ५६८
पिंपरी / ३७०
(प्रत्येक प्रकल्पातील सदनिका सर्वसाधारण प्रवर्ग (खुला), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी राखीव आहेत)
लाभार्थींना आनंद...
आम्ही मे महिन्यामध्ये नवीन घरात राहायला आलो आहोत. आधी आम्ही गवळी माथा येथे राहात होतो. स्वतःचे घर असावे, अशी इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे, अशी भावना बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील लाभार्थी मंगला वाडकर यांनी व्यक्त केली. माया पवार म्हणाल्या, ‘‘आम्हाला स्वतःचे घर मिळाले आहे. दसऱ्याला एक वर्ष पूर्ण होईल. घराचा आनंद सर्वात मोठा आहे.’’
‘‘पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील सदनिकांचे वाटप झाले आहे. डुडुळगाव प्रकल्पासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. ती आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे दीड हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा.
- अण्णा बोदडे, उपआयुक्त, महापालिका
‘‘आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका उभारणीसाठी पाठपुरावा केला. या योजनेतून सर्वाधिक प्रकल्प आणि सदनिका भोसरी विधानसभा मतदारसंघात उपलब्ध झाल्या आहेत. दूरदृष्टीचा विचार करून राबविलेल्या या योजनेला कोरोना काळ आणि मध्यंतरी निधीच्या अभावामुळे थोडा विलंब झाला. आता निधी उपलब्ध झाला असून नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.