चिंचवडमध्ये शनिवारपासून कीर्तन महोत्सव
आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजन; ढोक महाराज यांच्या हस्ते उद्‍घाटन

चिंचवडमध्ये शनिवारपासून कीर्तन महोत्सव आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजन; ढोक महाराज यांच्या हस्ते उद्‍घाटन

Published on

पिंपरी, ता. १० ः करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥ सदा धरुं संतसंग। मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥ करुं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥ जनी म्हणे कीर्ति करुं । नाम बळकट धरुं ॥... अशा शब्दांत संत जनाबाई यांनी कीर्तनाची महती सांगितली आहे. याच कीर्तनरुपी भक्तीचा सोहळा अर्थात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन ‘सकाळ’ने आषाढी वारीनिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारपासून केले आहे.
‘पंढरीची वारी चुकू नेदी हरि।’ अशी विनवणी वारकरी करत असतो. याच भावनेने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सखल संतांचे पायी पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, नोकरी, व्यवसाय वा कामधंद्यानिमित्त काही तात्कालिक अडचणींमुळे अनेकांना आषाढी वारीत जाणे शक्य होत नाही. पण, पांडुरंगाच्या सेवेची, नामस्मरणाची आस सर्वांना असते. त्यांच्यासाठीच ‘सकाळ माध्यम समूहा’ने कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते कीर्तन महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर त्यांची कीर्तनसेवा होईल. बुधवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होईल. वस्रकला पैठणी आणि सिल्क सारीज् हे सहप्रायोजक आहेत.

कीर्तनांची वेळ आणि कीर्तनकार
शनिवार, ता. १३ ः सायंकाळी ५ ः नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक
रविवार, ता. १४ ः सायंकाळी ५ ः पैठण येथील कीर्तनकार आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी
सोमवार, ता. १५ ः सायंकाळी ५ ः पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे
मंगळवार, ता. १६ ः सायंकाळी ५ ः आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील
बुधवार, ता. १७ ः सकाळी १० ः आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे

काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?
काय? ः ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह
कधी? ः १३ ते १७ जुलै २०२४
केव्हा? ः १३ ते १६ जुलै सायंकाळी ५. १७ जुलै सकाळी १०
कसे? ः प्रवेश विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क
शिवम ः ९३०७७१५९०३, अक्षय ः ९५६१३१४६७९

कीर्तन महोत्सवाविषयी वारकरी म्हणतात...
महाराष्ट्रातील संत विचार घरोघरी पोहचवण्याचे पवित्र कार्य ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. शहरातील वारकरी संप्रदायाचे उपासक, प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान आहे. शहरातील आबालवृद्धांना कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे. आपली ही सेवा अशीच अविरत चालू राहावी, अशी माउली आणि तुकोबारायांच्या चरणी विनम्र प्रार्थना!
- विजय नखाते, ज्येष्ठ वारकरी, रहाटणी

राज्यातील गाव-खेड्यांपासून शहरापर्यंतचे अनेक भाविकभक्त संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन, पंढरीच्या वाटेवर एकरूप होऊन चालत आहेत. धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच या वारीचा आनंद घेता येणे शक्य नसल्याने ‘सकाळ’ने शहरामध्ये कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही पर्वणी म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग...’ अशीच आहे.
- रामदास महाराज साखरे, ज्येष्ठ वारकरी, पिंपळे गुरव

फोटोः 31480,31484

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.