विठाई लेख नामदेव महाराज

विठाई लेख नामदेव महाराज

संतांच्या स्वागता
नामदेवांची पालखी

संत नामदेव महाराज यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू राहिले आहे. सातशे वर्षांपूर्वीचे पहिले संत चरित्रकार नामदेव महाराज हे आहेत. त्यांना आद्य संत चरित्रकार म्हणतात. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी पुढाकार घेतला. त्यांनी चोखामेळा, बंकामेळा यांना वारकरी संप्रदायात मोठे मानाचे स्थान प्राप्त करून दिले. याशिवाय, स्त्रीला शिक्षित करणारे पहिले संत म्हणूनही नामदेव महाराज यांना ओळखले जाते. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ हे त्यांचे ब्रीद होते.
- ज्ञानेश्‍वर महाराज नामदास, संत नामदेव महाराज पालखी सोहळा

संत नामदेव महाराज हे अस्पृश्यता निवारणासाठी पुढाकार घेणारे पहिले संत ठरले आहेत. संत चोखामेळा, बंकामेळा यांना त्यांनी फडाचे चोपदार बनविले. स्त्रीला शिक्षण देणारे पहिले संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. कित्येक शतकांपूर्वी त्यांनी स्त्री शक्ती ओळखून जनाबाई यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्यांना संतपद प्राप्त करून दिले.

संपूर्ण तीर्थयात्रा पायी
देशातील संपूर्ण तीर्थयात्रा पायी करणारे पहिले संत हे नामदेव महाराज आहेत. त्यांनी संपूर्ण पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका फडकविली. कन्याकुमारीपर्यंत सुद्धा नामदेव महाराज यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो.

कीर्तनामधून ज्ञानदीप प्रज्वलित
‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ हे त्यांचे ब्रीद होते. त्याकाळात कोणतेही प्रसारमाध्यमाचे साधन नव्हते. त्यामुळे, नामदेवरायांनी कीर्तन हे साधन वापरून सर्वांना समाविष्ट केले. तसेच घरोघरी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचे पहिले दिव्य काम त्यांनी केले. संत नामदेव महाराज यांनी मराठीत पहिला अभंग लिहिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि त्यांच्या भावडांचे चरित्र नामदेव महाराज यांनी लिहिले व त्यांची महती सर्वत्र पोहोचली.

नामदेवरायांकडून स्वागत
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरामधूनच वाखरीपर्यंत निघते. पंढरपूर हे नामदेव महाराज यांचे वतन आहे. नामदेवरायांच्या अभंगाप्रमाणे ‘वतन आमुची मिरासी पंढरी। विठोबाचे घरी नांदणूक॥’ पंढरीमध्ये म्हणजेच पांडुरंगाच्या आणि नामदेवरायांच्या गावात सर्व संतांच्या पालख्या येतात. पंढरपूरचे वतनदार या नात्याने नामदेवरायांच्या चरणपादुका वाखरी येथे सर्व संतांना स्वागत करण्यासाठी जातात.

वंशजांकडून परंपरेचे जतन
पूर्वीच्या काळी समाज फार थोडा होता. त्यावेळेस, पादुका भेट होत होती. आता समाजाची व्यापकता आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सर्व पालख्या संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई आणि संत नामदेवराय महाराज यांच्या पालख्या ओळीने उभ्या राहतात. त्यांचे क्रम लागले की, त्या पालख्यांचे चोपदार नामदेवरायांना येऊन भेटतात. आम्ही आलो आहे, मग, एकमेकांना श्रीफळ प्रदान केले जातात. वतनदार या नात्याने नामदेवरायांची पालखी पुढे चालते. त्यांच्या मागे इतर संतांच्या पालख्या येतात. अशा पद्धतीने संत नामदेवराय आपल्यासोबत सर्व संतांना घेऊन आपल्या घरी पंढरीला येतात, अशी परंपरा पूर्वापार आहे. नामदेवरायांचे वंशज आजही ती परंपरा त्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने जतन करत आहेत.

पालखी सोहळ्यात दहा दिंड्या
नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दहा दिंड्या असतात. दोन हजार वारकऱ्यांचा सहभाग असतो. दिंड्यांतील सर्व वारकरी हे पंढरपूर परिसरातील असतात.

रथाच्या बैलजोडीचा मान
पंढरपूर भागातील लोकांना बैलजोडीचा मान दिला जातो. प्रामुख्याने पंढरपूर भागातील भाविकांच्या बैलजोडीची त्यासाठी निवड केली जाते.

समाधी सोहळा उत्सव
वारीचे उत्सव दरवर्षी संत नामदेव महाराज मंदिरात थाटामाटात होतात. संत नामदेवांचा समाधी सोहळा हा मुख्य कार्यक्रम असतो. तो जवळपास एक महिना चालतो. आषाढ वद्य प्रतिपदेपासून सुरुवात होते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला आळंदीची वारी सुरू होते. अष्टमीला पोहोचते. कार्तिक वारीला नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा ज्ञानेश्‍वर महाराज यांना भेटण्याकरिता पंढरपूरहून आळंदीला येतो आणि मग तिथे मोठा कार्यक्रम होतो. ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन संत नामदेव महाराज यांनी केले होते. ती परंपरा आजही चालू आहे. त्यांचे वंशज समाधी सोहळ्याचे कीर्तन करतात.

नामदेवरायांचे वंशज
श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज पालखी सोहळ्याची व्यवस्था पाहतात. त्यामध्ये, ज्ञानेश्‍वर तुळशीदास नामदास, एकनाथ तुळशीदास नामदास, केशव महाराज नामदास, माधव महाराज नामदास, मुकूंद महाराज नामदास आदींचा समावेश आहे. दिवटी, पट्टेवाले आणि सेवाधाऱ्यांना मान दिला जातो.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com