

पिंपरी, ता. ३ : पुणे-नाशिक महामार्गावरील वखार महामंडळ गोदाम ते निगडीतील मुंबई - पुणे महामार्गावरील भक्ती - शक्ती चौक दरम्यान स्पाईन रस्त्याला अडथळा ठरणारी त्रिवेणीनगर चौकातील बांधकामे नुकतीच हटविण्यात आली आहेत. त्यानंतर रस्त्याच्या कामाला वेगात सुरुवात झाली असून हा रस्ता तीन महिन्यांत खुला होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या रस्त्यामुळे त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
वखार महामंडळ गोदामपासून सुरू होणारा हा रस्ता निगडीतून पुढे मुंबई - बंगळुरू आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जातो. काही वर्षांपूर्वी या स्पाईन रस्त्याची निर्मिती झाली. परंतु, त्रिवेणीनगर चौकातील काही बांधकामांमुळे या रस्त्याचे काम रखडले होते. चौकातील बांधकामे हटवून तेथील मिळकतधारकांचे अन्य ठिकाणी जागा देऊन पुनर्वसन करणे आवश्यक होते. मात्र, आता त्रिवेणीनगर चौकातील बाधितांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे, त्रिवेणीनगर चौकातील बांधकामे हटविण्यात आली असून रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाहतुकीत अंशतः बदल
सध्या या रस्त्याच्या कामाला वेगात सुरुवात झाली आहे. त्यासाठी वाहतुकीत अंशतः बदलही करण्यात आला आहे. दुर्गानगर चौकाकडून येणारी वाहने त्रिवेणीनगर चौकातून न वळता पुढे अंकुश चौकाच्या दिशेने जाऊन वळण घेत तळवडेच्या दिशेने जात आहेत. हे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
नाशिक, पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती जोडणार
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास स्पाईन रस्त्यावरील वाहतूक विनाअडथळा सुरू राहणार आहे. दुर्गानगर चौक, तळवडे, निगडी व भोसरीकडून येणाऱ्या वाहनांमुळे त्रिवेणीनगर चौकात होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. तसेच नाशिक महामार्ग, मुंबई -पुणे महामार्ग व द्रुतगती मार्ग जोडले जाणार असून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अरुंद रस्त्याने वारंवार कोंडी
निगडी ते तळवडे या मार्गावर त्रिवेणीनगर चौक असून या चौकातून तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहर यासह देहू-आळंदी तीर्थक्षेत्र येथे जाण्यासाठी मार्ग आहेत. मात्र, येथे वळण असून रस्ताही अरुंद असल्याने सतत वाहतूक कोंडी होती. सकाळी व सायंकाळी तर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. खूप वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या रस्त्याचे काम झाल्यास या वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची अपेक्षा वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौकातील बांधकामे हटविण्यात आली असून रस्त्याच्या कामाला वेगात सुरुवात झाली आहे. येत्या तीन महिन्यांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडी सुटून रहदारी सुरळीत होणार आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.