पणनमंत्री सत्तार यांचा परिषदेतून काढता पाय

पणनमंत्री सत्तार यांचा परिषदेतून काढता पाय
Published on

पिंपरी, ता. ३ ः पणन मंत्रालयातील भ्रष्टाचारावर बाजार समितीच्या संचालकांनी भाष्य केल्याने चिडलेल्या पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समित्यांच्या निगडी येथील राज्यस्तरीय परिषदेमधून गुरुवारी (ता.३) काढता पाय घेतला. एवढेच नाही संबंधित संचालकाला वादग्रस्त वक्तव्य करू नका, असे म्हणत सत्तारांनी तडकाफडकी व्यासपीठ सोडले. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राग व्यक्त करत ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतले.
राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती संघाच्यावतीने, निगडीतील ग.दि.माडगुळकर सभागृहात राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल या अनुषंगाने आयोजित या राज्यस्तरीय परिषदेचे उद्‍घाटन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. मात्र, सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड तास उशीराने पोहोचले. तेथे आल्यानंतर केवळ प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे, असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. अचानक सत्तार परिषदेतून निघून गेल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आणि चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीण कुमार नहाटा, पुणे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून ३०६ बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव उपस्थित होते.
बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परिषद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पणनमंत्री यांची वेळ घेऊनच ठरविण्यात आली होती. या परिषदेसाठी कृषी उत्पन्न समितीचे पदाधिकारी लांबून आले होते. मात्र, कॅबिनेट बैठकीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिले; तर अब्दुल सत्तारही अवघ्या पाच मिनिटांत समस्या न ऐकता सभेतून निघून गेल्याने समिती सदस्यांनी नाराजी दर्शविली.

पदाधिकाऱ्याचे ठिय्या आंदोलन
बाजार उत्पन्न समित्यांची बैठक सायंकाळी ७ पर्यंत चालणार होती. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती व अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याने परिषद पाचच्या सुमारास संपवावी लागली. त्यानंतर, चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यगृहासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला.

येत्या ७ तारखेला बंदची हाक
या परिषदेला आलेले सदस्य हे गावगाडा चालवणारे आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले न गेल्याने बाजार समितीचे सदस्य नाराज झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सोमवारी ७ ऑक्टोबरला राज्यभरातील बाजार समित्या बंद ठेवणार आहोत. त्याबाबत एकमत झाल्याचे बाळासाहेब नहाटा यांनी सांगितले.

राज्यात ३०० हून अधिक बाजार समित्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे प्रश्न वेगळे आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे बाजार समित्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. अशावेळी या खात्याचे मंत्री म्हणून अब्दुल सत्तार उपस्थित होते. मात्र, सदस्य आपल्या अडचणी मांडत असताना ते निघून गेले. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी म्हणून उत्तर देणे गरजेचे होते. परंतु, ते निघून गेले हे चुकीचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून या घटनेची माहिती देणार आहोत.
- बाळासाहेब नहाटा, सभापती, राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com